Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र ग्रामविकास परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी भाग्यश्री विवेक ठाकरे यांची नियुक्ती ग्रामीण विकासासाठी राज्यव्यापी संघटन विस्ताराची महत्त्वपूर्ण जबाबदारी



दिशा लाईव्ह न्यूज  :--::  ग्रामगौरव फाउंडेशन या राज्यस्तरीय सामाजिक संस्थेशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र ग्रामविकास परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी भाग्यश्री विवेक ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण विकास क्षेत्रातील त्यांचा सातत्यपूर्ण अभ्यास, सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग, प्रभावी नेतृत्व, संघटन कौशल्य आणि ग्रामविकासाबाबतची बांधिलकी लक्षात घेऊन ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

महाराष्ट्र ग्रामविकास परिषद ही राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावरील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामविकासाशी संबंधित विविध घटकांना एकत्रित करून ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी कार्यरत असलेली राज्यव्यापी संघटना आहे. शासनाच्या ग्रामीण विकासविषयक विविध योजना, शासन निर्णय, परिपत्रके, कल्याणकारी उपक्रम आणि विकासाभिमुख धोरणांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी परिषद सातत्याने प्रयत्नशील आहे.



परिषदेचे संस्थापक प्रणेते विवेक ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक कार्याध्यक्ष सुभाष मराठे यांनी भाग्यश्री ठाकरे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, ग्रामीण विकास क्षेत्रातील त्यांचा अभ्यास, समाजाभिमुख दृष्टिकोन, विविध प्रश्नांवरील संवेदनशीलता आणि संघटन उभारणीची क्षमता लक्षात घेऊन त्यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्ष म्हणून भाग्यश्री ठाकरे यांच्यावर राज्यभर परिषदेचे संघटन अधिक बळकट करणे, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करणे, ग्रामीण विकासाशी संबंधित विविध घटकांमध्ये समन्वय निर्माण करणे आणि त्यांच्या प्रश्नांना शासनदरबारी प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

त्याचबरोबर राज्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी, संगणक परिचालक, रोजगार हमी योजनेचे रोजगार सहाय्यक तसेच पंचायतराज व्यवस्थेतील इतर सर्व घटकांच्या विविध अडीअडचणी, प्रलंबित प्रश्न, सेवा विषयक मागण्या आणि विकासाशी संबंधित समस्यांवर संघटनात्मक पातळीवर पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या विशेष प्रयत्न करणार आहेत.

याशिवाय ग्रामीण भागात स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, युवकांचे कौशल्य विकास, ग्रामरोजगार, डिजिटल ग्रामपंचायत, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत ग्रामीण विकास या विषयांवर जनजागृती व विविध उपक्रम राबविण्यालाही त्यांच्या नेतृत्वाखाली प्राधान्य दिले जाणार असल्याचे परिषदेच्या वतीने सांगण्यात आले.


भाग्यश्री ठाकरे यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्र ग्रामविकास परिषदेच्या कार्याला अधिक बळ मिळेल, राज्यभर संघटन विस्ताराला वेग येईल आणि ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या नियुक्तीचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, ग्रामपंचायत आणि ग्रामविकास क्षेत्रातील विविध मान्यवरांनी स्वागत केले असून, भाग्यश्री विवेक ठाकरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राज्यातील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्या प्रभावी नेतृत्व करतील आणि ग्रामविकास चळवळीला अधिक व्यापक स्वरूप देतील, असा विश्वासही अनेकांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments