दिशा लाईव्ह न्यूज-:-- दि. १६ जुलै। फर्दापूर व पिंपळा येथील काही महाविद्यालयांमध्ये अकरावी, बारावी तसेच पदवी (प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष) प्रवेश प्रक्रिया सुरू असताना विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य पद्धतीने प्रवेश देऊन मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात असल्याचा गंभीर आरोप विद्यार्थी व पालकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित महाविद्यालयांमध्ये नियमित अध्यापन होत नसतानाही विविध पदवी व डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिले जात आहेत. अनेक अभ्यासक्रमांसाठी आवश्यक त्या पात्र प्राध्यापकांची नियुक्ती नसल्याचा तसेच वर्ग नियमितपणे भरत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहावे लागत असून केवळ कागदोपत्री प्रवेश दाखवून शुल्क वसूल केले जात असल्याची तक्रार आहे.
जळगाव, संभाजीनगर, बुलढाणा तसेच इतर जिल्ह्यांतील अनेक विद्यार्थी या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेत असल्याचे सांगितले जाते. मात्र, नियमित शिक्षण न मिळाल्याने विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांची शुल्काच्या नावाखाली फसवणूक होत असल्याचा आरोप विद्यार्थी व पालकांनी केला आहे.
यासंदर्भात विद्यार्थ्यांनी संबंधित विद्यापीठ व उच्च शिक्षण विभागाने या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून प्रत्यक्ष परिस्थितीची पडताळणी करावी, तसेच नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
प्रभारी प्राचार्यांच्या नियुक्तीवरही प्रश्नचिन्ह?
विद्यार्थ्यांकडून असा आरोप करण्यात आला आहे की, पिंपळा येथील महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीविरोधात बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणीतील कथित गैरप्रकारासंदर्भात फर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे सांगितले जाते. असे असतानाही त्यांची पुन्हा प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या सर्व आरोपांबाबत संबंधित महाविद्यालय प्रशासनाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाचे म्हणणे उपलब्ध झाल्यानंतर तेही प्रसिद्ध करण्यात येईल.

Post a Comment
0 Comments