Type Here to Get Search Results !

अज्ञात वाहनाच्या धडकेने पहूर येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू; अवघ्या काही दिवसांत उलगडला तपास नेरी आऊट पोस्टच्या पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी; ट्रक व चालक ताब्यात, एपीआय स्वप्नील शिंदे यांच्या तपासाचे सर्वत्र कौतुक


पहूर, ता. जामनेर (प्रतिनिधी):

दिशा लाईव्ह न्यूज --::--जळगाव–छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील भवानी माता मंदिराजवळ ३ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघातात पहूर येथील डेंटल इक्विपमेंट सेल्स अँड सर्व्हिसचे संचालक नरेंद्र उर्फ बाळू वसंत बडगुजर (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला होता. 

अपघातानंतर अज्ञात वाहन फरार झाल्याने या प्रकरणाचा तपास पोलिसांसमोर मोठे आव्हान बनला होता. मात्र नेरी आऊट पोस्टचे एपीआय स्वप्नील रामदास शिंदे आणि त्यांच्या सहकारी पथकाने अत्यंत बारकाईने, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आणि सातत्यपूर्ण तपासातून अवघ्या काही दिवसांत या गुन्ह्याचा उलगडा करत संबंधित ट्रक व चालकाला ताब्यात घेतले आहे.

घटनेच्या दिवशी नरेंद्र बडगुजर हे नेहमीप्रमाणे जळगाव येथे दिवसभराचे कामकाज आटोपून त्यांच्या एमएच-१९-ईक्यू-८३५४ क्रमांकाच्या दुचाकीवरून पहूरकडे परतत होते. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास भवानी माता मंदिराजवळ मागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की ते काही अंतर फरफटत गेले आणि गंभीर दुखापतीमुळे घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्याने तातडीची मदत मिळू शकली नाही.



अपघातानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. त्यामुळे सुरुवातीला हा तपास अत्यंत गुंतागुंतीचा ठरत होता. मात्र एपीआय स्वप्नील शिंदे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर घटनास्थळावरील परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. परिसरातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज, वाहनांच्या हालचाली, वेळा आणि मार्गांचा सखोल अभ्यास करण्यात आला.

तपासादरम्यान सुरुवातीला शेंदुर्णी येथील एका बँडच्या वाहनावर संशय घेत चौकशी करण्यात आली. त्या चौकशीतून मिळालेल्या महत्त्वाच्या धाग्यांच्या आधारे तपासाची दिशा बदलली. त्यानंतर तपास पथकाने धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे जाऊन एमएच-३०-सी-०९३३ क्रमांकाचा ट्रक शोधून काढला.

ट्रक चालक रज्जाक भिकन पिंजारी याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने सदर अपघात आपणाकडून झाल्याची कबुली दिली. तसेच जालनाकडे जात असताना हा अपघात घडल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ट्रक आणि चालकाला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली.

या संपूर्ण तपासात एपीआय स्वप्नील शिंदे यांनी दाखविलेली कर्तव्यदक्षता, तांत्रिक पुराव्यांचा प्रभावी वापर, प्रत्येक धागा तपासण्याची चिकाटी आणि तपासातील अचूक नियोजन यामुळे अवघड वाटणारा गुन्हा उघडकीस आला. त्यांच्या सहकारी पोलीस पथकानेही दिवसरात्र परिश्रम घेत तपासाची प्रत्येक कडी जोडत आरोपीपर्यंत पोहोचण्यात मोलाची भूमिका बजावली.

या यशस्वी तपासामुळे अपघातग्रस्त कुटुंबाला न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून एपीआय स्वप्नील शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण तपास पथकाचे परिसरातून कौतुक होत आहे. नागरिकांनीही या तपासामुळे पोलीस यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments