दिशा लाईव्ह न्यूज --::----महाराष्ट्राचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याबाबत सोशल मीडियावर अत्यंत आक्षेपार्ह, दिशाभूल करणारी, खोटी, बदनामीकारक आणि समाजात संभ्रम निर्माण करणारी पोस्ट १९ जून २०२६ रोजी मध्यरात्री माझ्या निदर्शनास आली. सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या लोकप्रतिनिधीची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचा हा गंभीर आणि नियोजित प्रयत्न असल्याचे लक्षात येताच, कोणताही विलंब न करता दुसऱ्याच दिवशी सकाळी ९ वाजता मी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली.
माझ्या तक्रारीची जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अत्यंत गांभीर्याने दखल घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्याधुनिक तांत्रिक साधनांचा वापर करून सखोल तपास केला. डिजिटल पुरावे, सोशल मीडिया ट्रेल, आयपी लॉग्स आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे संबंधित आरोपीपर्यंत यशस्वीरीत्या पोहोचत त्याला अटक करण्यात आली.
या प्रकरणातील आरोपी भरत बाळाजी म्हस्के (वय ३४), रा. इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे याला अटक करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. तक्रारीची तातडीने दखल घेऊन निष्पक्ष, वेगवान आणि परिणामकारक तपास करून आरोपीपर्यंत पोहोचण्याची कार्यक्षमता त्यांनी सिद्ध केली. तसेच जळगाव सायबर पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे, तांत्रिक कौशल्यामुळे आणि अथक परिश्रमांमुळे नागरिकांचा सायबर पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
या संपूर्ण कारवाईतून एक महत्त्वाचा संदेश समाजासमोर आला आहे— सोशल मीडियावर बनावट (Fake) अकाउंट तयार करून, खोटी पोस्ट टाकून, फोटो किंवा व्हिडिओ एडिट करून, दिशाभूल करणारी माहिती पसरवून किंवा कोणत्याही व्यक्तीची जाणीवपूर्वक बदनामी करून कायद्यापासून सुटका होणार नाही.
अनेकांना वाटते की, खोट्या नावाने किंवा बनावट प्रोफाइलद्वारे सोशल मीडियावर काहीही लिहिले, पोस्ट केले किंवा शेअर केले तरी आपण सुरक्षित राहू. परंतु आजचे सायबर तंत्रज्ञान अत्यंत सक्षम आहे. प्रत्येक डिजिटल हालचालीचा मागोवा घेणे शक्य आहे. बनावट अकाउंट, फेक आयडी, व्हीपीएन किंवा इतर माध्यमांचा वापर करून स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला, तरीही तपास यंत्रणा डिजिटल पुराव्यांच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचू शकते.
लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला मत व्यक्त करण्याचा, प्रश्न विचारण्याचा आणि विधायक टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र खोटी माहिती पसरवणे, अफवा निर्माण करणे, चारित्र्यहनन करणे, बनावट पोस्ट तयार करणे, फोटो किंवा व्हिडिओमध्ये फेरफार करून समाजात संभ्रम निर्माण करणे आणि एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठा जाणीवपूर्वक मलिन करणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग नाही; तो कायद्याने शिक्षापात्र गुन्हा आहे.
आमच्या नेतृत्वाची, आमच्या दैवताची किंवा कोणत्याही नागरिकाची खोटी बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे—तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असाल, कितीही बनावट अकाउंट वापरत असाल किंवा कोणत्याही माध्यमातून स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न करत असाल, तरी कायद्याच्या हातातून सुटका होणार नाही. डिजिटल पुरावे कायमस्वरूपी नोंदले जातात आणि योग्य वेळी त्याच पुराव्यांच्या आधारे दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
सायबर गुन्हे, खोट्या पोस्ट, बनावट अकाउंट आणि बदनामी करणाऱ्यांसाठी हा एक स्पष्ट आणि कठोर इशारा आहे— सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करा. सत्य माहितीच प्रसारित करा. अन्यथा कायद्याला आपले काम करावेच लागेल.
– अरविंद भगवान देशमुख
नगरसेवक, जळगाव महानगरपालिका
प्रभाग क्र. १५

Post a Comment
0 Comments