Type Here to Get Search Results !

आज दुपारी देव पिंपरी फाट्याजवळ भीषण अपघात; पाळधी येथील तरुणाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी



पहूर प्रतिनिधी- ता. जामनेर 

दिशा लाईव्ह न्यूज :-: जामनेर तालुक्यातील देव पिंपरी फाट्याजवळ सोमवारी (दि. २०) दुपारी झालेल्या भीषण रस्ते अपघातात पाळधी येथील एका तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत हा भीषण अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पाळधी गावावर शोककळा पसरली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी येथील गणेश भगवान धनगर (वय ३३) व पवन शिवाजी शेळके (वय २९) हे दोघे MH 19 DS 1022 क्रमांकाच्या स्प्लेंडर दुचाकीवरून जळगावकडे निघाले होते. दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास ते देव पिंपरी फाट्याजवळ पोहोचले असता, MH 19 CX 2826 क्रमांकाच्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडकेचा वेग इतका प्रचंड होता की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातात गणेश भगवान धनगर यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर पवन शिवाजी शेळके हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला व शरीराच्या विविध भागांना मार लागल्याची माहिती मिळाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.



अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी पवन शेळके यांना त्वरित रुग्णवाहिकेद्वारे जळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. नागरिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला असून डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत.

या दुर्दैवी घटनेमुळे पाळधी गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गणेश धनगर यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक व मित्रपरिवारात शोक व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, देव पिंपरी फाटा आणि या मार्गावर भरधाव व बेदरकार वाहनचालकांमुळे वारंवार अपघात होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. या मार्गावर वेगमर्यादेची कठोर अंमलबजावणी करावी, धोकादायक वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments