Type Here to Get Search Results !

कळमसरा गावात घाणीचे साम्राज्य; तुंबलेल्या गटारी, सांडपाण्याने भरलेले रस्ते अन् मोकाट डुकरांचा मुक्त संचार आदर्श गावाची ओळख जपण्यासाठी आता गरज स्वच्छ, सुंदर आणि निरोगी कळमसराची; ग्रामस्थांच्या आरोग्याशी सुरू आहे का खेळ?


दिशा लाईव्ह न्यूज --::--पाचोरा तालुक्यातील कळमसरा हे एकेकाळी आदर्श गाव म्हणून ओळखले जाणारे गाव. सुखी-सधन शेतकरी, धार्मिकतेचा वारसा, सामाजिक सलोखा आणि गावाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या अनेक नामवंत व्यक्तींची परंपरा लाभलेल्या या गावाची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. मात्र, सध्या गावातील अस्वच्छतेची परिस्थिती पाहता या लौकिकाला गालबोट लागण्याची वेळ आली आहे.



गावातील अनेक ठिकाणी गटारी तुंबलेल्या असून सांडपाणी थेट रस्त्यावर साचत आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर चिखल, घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत परिस्थिती अधिकच गंभीर होत असून नागरिकांना याच सांडपाण्यातून मार्ग काढत ये-जा करावी लागत असल्याचे चित्र आहे.

                      गटारी की सांडपाण्याचे नाले?

गावातील अनेक भागांत गटारींची नियमित साफसफाई होत नसल्याने त्या तुडुंब भरल्या आहेत. सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्यामुळे घरांसमोर आणि रस्त्यांच्या कडेला पाणी साचून राहत आहे. यामुळे दुर्गंधी तर निर्माण होत आहेच; शिवाय डास, माशा आणि विविध कीटकांचा उपद्रव वाढण्याची शक्यता आहे.

महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि शाळकरी विद्यार्थ्यांना अशा अस्वच्छ वातावरणातून मार्ग काढावा लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

                         मोकाट डुकरांचा मुक्त संचार

या अस्वच्छतेत आणखी भर पडत आहे ती मोकाट डुकरांच्या मुक्त संचारामुळे. गटारी, साचलेले सांडपाणी आणि कचऱ्याच्या ठिकाणी डुकरांचा वावर वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे गावातील स्वच्छतेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

साचलेले पाणी आणि अस्वच्छ परिसरामुळे डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता असल्याने डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो, अशी नागरिकांमध्ये भीती आहे. त्यामुळे हा केवळ सौंदर्याचा प्रश्न नसून सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर विषय असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.



‘आदर्श कळमसरा’ची ओळख पुन्हा निर्माण करण्याची गरज.

कळमसरा गावाला मोठी सामाजिक आणि धार्मिक परंपरा लाभली आहे. गावातील अनेक नामवंत व्यक्तींनी आपल्या कार्यातून गावाचा नावलौकिक वाढविला. सधन शेतकरी, कष्टाळू ग्रामस्थ आणि धार्मिक-सामाजिक वारसा ही गावाची खरी ताकद आहे.

मात्र, गावाचा विकास केवळ आर्थिक सुबत्तेने होत नाही; स्वच्छता, आरोग्य आणि चांगल्या मूलभूत सुविधाही तितक्याच महत्त्वाच्या असतात.

म्हणूनच आज कळमसराला गरज आहे ती स्वच्छ, सुंदर, निरोगी आणि आदर्श गावाची ओळख पुन्हा निर्माण करण्याची.

                   ग्रामपंचायतीच्या भूमिकेकडे लक्ष

गावातील स्वच्छता, गटारींची नियमित साफसफाई, कचरा व्यवस्थापन आणि सांडपाण्याचा योग्य निचरा याबाबत ग्रामपंचायतीने प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. नागरिकांनीही स्वच्छतेबाबत आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाने प्रत्यक्ष गावात पाहणी करून परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि तातडीने विशेष स्वच्छता मोहीम राबवावी. केवळ कागदोपत्री स्वच्छतेचे दावे न करता प्रत्यक्षात गाव स्वच्छ दिसले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


                          ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या!

@तुंबलेल्या सर्व गटारींची तातडीने साफसफाई करावी.

@ रस्त्यांवर साचलेले सांडपाणी, चिखल आणि घाण हटवावी.

@ संपूर्ण गावात विशेष स्वच्छता मोहीम राबवावी.

@ मोकाट डुकरांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय करावा.

@ डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी.

@ सांडपाण्याच्या निचऱ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी.

@ कचरा संकलन व विल्हेवाटीची नियमित व्यवस्था करावी.

@ गावात नियमित स्वच्छता कर्मचारी व यंत्रणा कार्यरत ठेवावी.

        गावकऱ्यांचा सवाल : ‘आदर्श गाव’ पुन्हा कधी होणार?

कळमसरा हे केवळ एक गाव नाही, तर परंपरा, संस्कृती, धार्मिकता आणि कष्टाळू शेतकऱ्यांचा वारसा जपणारे गाव आहे. या गावाची ओळख घाणीच्या साम्राज्याने नव्हे, तर स्वच्छता, सुंदरता आणि विकासाने व्हावी, ही प्रत्येक ग्रामस्थाची अपेक्षा आहे.

“गाव स्वच्छ असेल तरच गाव निरोगी राहील आणि गाव निरोगी असेल तरच खऱ्या अर्थाने विकास साधला जाईल.”

त्यामुळे संबंधित प्रशासन, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घेऊन ‘आदर्श कळमसरा’चा वारसा जपत ‘स्वच्छ, सुंदर आणि निरोगी कळमसरा’ निर्माण करण्याची वेळ आली आहे.

आता प्रश्न एवढाच—गावाच्या आरोग्याचा आणि स्वच्छतेचा हा प्रश्न आणखी किती दिवस दुर्लक्षित राहणार? ग्रामस्थांच्या या मागण्यांकडे संबंधित प्रशासन किती गांभीर्याने पाहते आणि प्रत्यक्षात कोणती ठोस पावले उचलते, याकडे संपूर्ण कळमसरा गावाचे लक्ष लागले आहे.



Post a Comment

0 Comments