Type Here to Get Search Results !

खान्देशच्या सुपुत्राचा मराठवाड्यात गौरव; डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांना 'महा अॅक्युपंक्चर रत्न पुरस्कार २०२६' प्रदान


दिशा लाईव्ह न्यूज --::---खान्देशची शान आणि जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याचे सुपुत्र डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांना आरोग्य सेवा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत 'महा अॅक्युपंक्चर रत्न पुरस्कार २०२६' या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार दि. १९ जुलै २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित भव्य आणि दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन (AIMA) आणि AGMA यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात आला. आयुर्वेद, योग, सिद्ध, होमिओपॅथी, अॅक्युपंक्चर आणि निसर्गोपचार अशा विविध उपचार पद्धतींचा प्रचार-प्रसार आणि जनजागृती करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.

चोपडा तालुक्यातील 'वामन अॅक्युपंक्चर अँड नॅचरोपॅथी सेंटर' चे संचालक असलेले डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अॅक्युपंक्चर व निसर्गोपचाराच्या माध्यमातून हजारो रुग्णांना उपचार देत आरोग्यसेवेचे उल्लेखनीय कार्य केले आहे. ग्रामीण भागातील रुग्णांनाही प्रभावी, सुलभ आणि नैसर्गिक उपचार उपलब्ध करून देण्याचे त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय मानले जाते. त्यांच्या या समाजोपयोगी सेवेला मिळालेली ही मोठी पावती असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाला मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते डॉ. सुयोग गोरेंद्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. नाझिर काझी, ॲड. दत्ता त्रय जाधवर, ॲड. नागेश सोनुने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी चेअरमन डॉ. सतीश कराळे, व्हाईस चेअरमन डॉ. नितीनराजे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे, डॉ. अभिजीत कवठकर, डॉ. प्रशांत सावंत, डॉ. दिशा चव्हाण, डॉ. स्मिता खारकर, डॉ. विनोद ढोबळे, डॉ. सारंग फुके, डॉ. श्रीधर मेश्राम, डॉ. राजेंद्र गोरे, डॉ. तुषार वाघुळदे, डॉ. विजय पाटील यांच्यासह AIMA व AGMA चे पदाधिकारी, विविध राज्यांतील वैद्यकीय तज्ज्ञ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या सन्मानामुळे खान्देशासह जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments