Type Here to Get Search Results !

दिशा लाईव्ह न्यूजच्या वृतांची दखल वाकडी येथे हातभट्टी गावठी दारू विक्रेत्यांवर फत्तेपूर पोलिसांची धडक कारवाई; चार जण ताब्यात, ३,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त


वाकडी, ता. जामनेर 

दिशा लाईव्ह न्यूज -:--जामनेर तालुक्यातील वाकडी गावात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या हातभट्टी गावठी तसेच देशी-विदेशी दारूच्या बेकायदेशीर विक्रीवर अखेर फत्तेपूर पोलिसांनी धडक कारवाई करत चार जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण ३,४०० रुपयांचा गावठी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधित आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 १५ जुलै रोजी या संदर्भात दिशा लाईव्ह न्यूजने याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. गावात अनेक दिवसांपासून हातमदी दारूची खुलेआम विक्री होत असल्याने अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जात असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात होती. यामुळे गावात वारंवार भांडणे, कौटुंबिक वाद आणि सामाजिक वातावरण बिघडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया प्रसारित करून पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

या तक्रारींची दखल घेत फत्तेपूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने वाकडी गावात धाड टाकली. कारवाईदरम्यान गावातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या अवैध गावठी दारू विक्रीवर छापे टाकण्यात आले.

या कारवाईत शेखर तडवी याच्याकडून सुमारे पाच लिटर गावठी दारू, ईश्वर राजपूत याच्याकडून पाच लिटर गावठी दारू, तर रोहितदास मोची आणि लक्ष्मण जोशी यांच्याकडून मिळून दहा लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या दारूची एकूण किंमत ३,४०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दारू विक्रेत्यांसह दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या तीन जणांवरही महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार स्वतंत्र कारवाई करण्यात आली. गावात अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहतील, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव, सहाय्यक फौजदार प्रवीण चौधरी, तसेच पोलीस कर्मचारी गणेश तडवी, चेतन तांगडे, भूषण पाटील, अमोल लोहार आणि पाहूरंग सुरवसे यांनी सहभाग घेतला.

या धडक कारवाईमुळे वाकडी गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी अशाच कठोर कारवाया सुरू ठेवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments