Type Here to Get Search Results !

पाणी बचतीचा संदेश देत आर. बी. आर. माध्यमिक विद्यालयाची पंढरीची दिंडी उत्साहात; भारुडातून जलसंवर्धनाची प्रभावी जनजागृती


पहूर, ता. जामनेर -प्रतिनिधी.

दिशा लाईव्ह न्यूज --::---आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत आर. बी. आर. माध्यमिक विद्यालय, पहूर (ता. जामनेर, जि. जळगाव) यांच्या वतीने पारंपरिक पंढरीची दिंडी मोठ्या भक्तिमय, उत्साही आणि समाजप्रबोधनात्मक वातावरणात काढण्यात आली. वारकरी परंपरेची संस्कृती जपत विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषात आणि अभंग-भजनांच्या सुरेल सादरीकरणातून संपूर्ण पहूर नगरी भक्तिरसात न्हाऊन काढली.

दिंडीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून विठ्ठलभक्तीचा अनोखा आविष्कार साकारला. विठुरायाच्या नामस्मरणासोबतच समाजासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जलसंवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. "पाणी अडवा, पाणी जिरवा", "रेन वॉटर हार्वेस्टिंग", "पाण्याची बचत हीच काळाची गरज" आणि "प्रत्येक थेंब अमूल्य आहे" अशा घोषणांसह भारुडाच्या माध्यमातून पाण्याचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले.

भारुडाच्या आकर्षक सादरीकरणातून भूजल पातळी घटण्याची समस्या, पावसाचे पाणी साठविण्याची गरज, जलस्रोतांचे संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि भावी पिढ्यांसाठी पाणी जपण्याची जबाबदारी याविषयी अत्यंत समर्पक संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक केले.

दिंडीचे गावातील विविध मान्यवरांच्या हस्ते ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यामध्ये मा. सरपंच तथा माजी कृषी सभापती (जि. प. जळगाव) प्रदीपभाऊ लोढा, वाकोद गावाचे माजी सरपंच तेजराज जैन, उत्तर महाराष्ट्र धनगर समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष रामेश्वर पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष योगेशभाऊ भडांगे तसेच श्री केवडेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष समाधान पाटील यांनी दिंडीचे स्वागत करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

दिंडी गावातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत असताना अनेक ठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करून वारकऱ्यांचे स्वागत केले. गावामध्ये उपसरपंच शरदभाऊ पांढरे व डॉ. प्रशांतजी पांढरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत आरती करण्यात आली. तसेच श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी शंखनाद करून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून टाकला.

कार्यक्रमात अनेक सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, पालक, सुज्ञ नागरिक तसेच पत्रकार संतोषभाऊ पांढरे यांची विशेष उपस्थिती लाभली. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती भारती पवार, श्रीमती सुनंदा पाटील, श्रीमती सरोजिनी वानखेडे आणि श्रीमती पुनम श्रीकृष्ण पाटील यांनी भारुडाच्या माध्यमातून जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि पाणी बचतीचा अत्यंत प्रभावी संदेश दिला. त्यांच्या सादरीकरणामुळे उपस्थितांमध्ये पाणी संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संस्कृतीचे संस्कार रुजविण्यासोबतच सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि जलसाक्षरतेची जाणीव निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला. धार्मिक परंपरा आणि समाजहिताचा संदेश यांची सुंदर सांगड घालणारा हा अभिनव उपक्रम उपस्थित नागरिकांच्या विशेष पसंतीस उतरला.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे सचिव अरुण पवार यांनी या समाजप्रबोधनात्मक व प्रेरणादायी उपक्रमाचे कौतुक करत सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि आयोजकांचे अभिनंदन केले. भविष्यातही अशाच विधायक उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी विद्यालय सातत्याने प्रयत्नशील राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments