दिशा लाईव्ह न्यूज :-: शहराजवळील तीसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर शुक्रवारी (दि. २१) घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला. ‘आयफोन 15’ मोबाईलच्या हट्टावरून नैराश्यात गेलेल्या १८ वर्षीय तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांचाही डोंगरावरून कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या घटनेत कुणाल मुरलीधर चांदवडे (वय १८), मुरलीधर चांदवडे आणि संगिता चांदवडे यांचा मृत्यू झाला.
सकाळपासून डोंगराच्या कड्यावर तरुण
मिळालेल्या माहितीनुसार, देवळाई परिसरातील कुणाल चांदवडे शुक्रवारी सकाळी सुमारे दहा वाजता खवड्या डोंगराच्या दिशेने गेला. तो डोंगराच्या कड्यावर उभा राहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर त्याचे आई-वडील तातडीने डोंगरावर पोहोचले. त्यांनी पोलिसांनाही घटनेची माहिती दिली.
कुणालची समजूत काढण्यासाठी कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांनी प्रयत्न सुरू केले. मात्र तो अत्यंत तणावाच्या अवस्थेत असल्याने कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.
पोलिस आणि अग्निशमन पथक घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तरुणाने उडी घेतल्यास त्याचा जीव वाचवता यावा, यासाठी खाली सुरक्षा जाळी लावण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
दरम्यान, तीसगावच्या सरपंचांसह स्थानिक नागरिकांनीही कुणालशी संवाद साधून त्याला मागे येण्याचे आवाहन केले. तब्बल दोन ते तीन तास त्याची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते.
“तुला आयफोन 15 प्रो देतो...” अशीही विनवणी
कुणालची समजूत काढताना तीसगावच्या सरपंचांनी त्याला, “मी गावचा सरपंच आहे. माझ्याकडे मोबाईल आहे. तुला आयफोन 15 प्रो देतो,” असे सांगून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला.
मात्र कुणालने आपण अत्यंत हताश असल्याचे संकेत देत, “आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन आहे,” असे म्हटल्याचे सरपंचांनी सांगितले.
त्यावेळी त्याची आई रडत त्याला समजावत होती. “दुसरं सोल्यूशन नाही, असं का वाटतं तुला?” अशी आर्त विनवणी तिने केली.
मुलाचा हात पकडण्याचा प्रयत्न अन् काळजाचा ठोका चुकवणारी घटना.......
शेवटच्या काही मिनिटांत कुणालचे वडील त्याच्या जवळ गेले. मुलाला बोलण्यात गुंतवून त्याला सुरक्षितपणे मागे आणण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र कुणालने अचानक डोंगराच्या कड्यावरून खाली झोकून दिले.
त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न करणारे वडीलही त्याच्यासोबत सुमारे ६० ते ७० फूट खोल दरीतील दगडांवर कोसळले. हा प्रकार डोळ्यांसमोर घडल्याने आई हादरली. त्यानंतर ती पुढे सरसावली असता तिचाही तोल जाऊन ती डोंगरावरून खाली कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे.
तीन तासांचे प्रयत्न ठरले निष्फळ
तीसगावच्या सरपंचांच्या माहितीनुसार, कुणाल सकाळी दहा वाजल्यापासून डोंगराच्या कड्यावर होता. तो वारंवार जागा बदलत होता आणि आईशी बोलतही होता. दुपारी एक वाजेपर्यंत त्याची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते.
शेवटच्या १५ ते २० मिनिटांत वडील त्याच्याजवळ गेले. त्याला पकडून सुरक्षितपणे मागे आणण्याचा प्रयत्न सुरू असतानाच हा दुर्दैवी प्रकार घडला.
परिसरात हळहळ
घटनेनंतर तीसगाव परिसरात मोठी खळबळ उडाली. डोंगराच्या पायथ्याशी शेकडो नागरिक जमा झाले होते. पोलीस आणि बचाव पथकाने तातडीने मदतकार्य सुरू केले.
उंचावरून खाली कोसळल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
या घटनेतून एक अत्यंत गंभीर संदेश समोर येतो—क्षणिक नैराश्य, हट्ट किंवा भावनिक उद्रेकातून घेतलेला टोकाचा निर्णय संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू शकतो. अशा वेळी व्यक्तीला एकटे न सोडता तातडीने कुटुंबीय, विश्वासू व्यक्ती, पोलीस किंवा प्रशिक्षित मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.




Post a Comment
0 Comments