Type Here to Get Search Results !

तारखेडा रेल्वे गेटचा प्रश्न ऐरणीवर; खासदार स्मिताताई वाघ यांची तातडीने पाहणी शेतकरी रस्ता बंद झाल्याने निर्माण झालेल्या समस्येवर पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना; पाचोरा स्थानकावर विदर्भ एक्स्प्रेसच्या थांब्यासाठीही प्रयत्नांचे आश्वासन


दिशा लाईव्ह न्यूज --::--- तारखेडा परिसरातील रेल्वे गेट तसेच शेतकऱ्यांसाठी वापरला जाणारा रस्ता बंद करण्यात आल्याने निर्माण झालेल्या गंभीर समस्येची खासदार स्मिताताई वाघ यांनी तातडीने दखल घेत प्रत्यक्ष पाहणी केली. रेल्वे प्रशासनाने अचानक रस्ता बंद केल्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असून, या प्रश्नावर तातडीने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या सूचना खासदार वाघ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या संदर्भात तारखेडा परिसरातील ग्रामस्थांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांची भेट घेऊन आपली समस्या मांडली होती. ग्रामस्थांच्या अडचणींची गंभीर दखल घेत आमदार पाटील यांनी तातडीने खासदार स्मिताताई वाघ यांच्याशी संपर्क साधून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.

दरम्यान, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र (राजू दादा) पाटील यांनीही खासदार स्मिताताई वाघ यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून तारखेडा परिसरातील रेल्वे मार्गामुळे निर्माण झालेल्या अडचणी तसेच ग्रामस्थांच्या विविध मागण्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सूचनेनुसार आणि राजू दादा पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत खासदार वाघ यांनी अवघ्या दोन ते तीन दिवसांत तारखेडा येथे दाखल होत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.

🚧 रेल्वे प्रशासनाला पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना

पाहणीदरम्यान खासदार स्मिताताई वाघ यांनी रेल्वे मार्गालगत विविध ठिकाणी जाऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. ज्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून रस्ता बंद करण्यात आला आहे, त्या ठिकाणी शेतकरी व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तातडीने पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.

🚆 पाचोरा रेल्वे स्थानकावर अधिक गाड्यांच्या थांब्याची मागणी

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजू दादा पाटील यांनी पाचोरा रेल्वे स्थानकावरील प्रवासी सुविधांमध्ये वाढ करण्यासोबतच अधिक रेल्वे गाड्यांना पाचोरा येथे थांबा देण्याची मागणी खासदार स्मिताताई वाघ यांच्याकडे केली.

या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना खासदार वाघ यांनी प्रथम विदर्भ एक्स्प्रेसला पाचोरा येथे थांबा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, तसेच इतर रेल्वे सुविधा व मागण्यांसाठीही टप्प्याटप्प्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

या पाहणीप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे, सुभाष पाटील, नंदू बापू पाटील, गणेश पाटील वाघुळखेडा यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

🕯️ रेल्वे अपघातातील मृताच्या कुटुंबीयांचे सांत्वन

पाहणीनंतर खासदार स्मिताताई वाघ यांनी काही दिवसांपूर्वी तारखेडा येथे झालेल्या दुर्दैवी रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या तालुकाप्रमुख राजू दादा पाटील यांच्या चुलत पुतण्याच्या कुटुंबीयांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करून दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला.

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक वसंत वाघ, शिवसेना शाखाप्रमुख धनराज पाटील, किशोर पाटील, पंकज पाटील, आनंदा पाटील, निलेश पाटील, विजय पाटील, शरद पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांच्या प्रश्नावर तातडीने धाव घेत प्रत्यक्ष पाहणी आणि पर्यायी व्यवस्थेच्या सूचना दिल्याने तारखेडा परिसरातील शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



Post a Comment

0 Comments