पहूर प्रतिनिधी- ता. जामनेर
दिशा लाईव्ह न्यूज ::--::-येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात पालक-शिक्षक सहविचार सभा उत्साहपूर्ण व सकारात्मक वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी पालक आणि शिक्षक यांच्यात सातत्यपूर्ण समन्वय असणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. सभेत पालक-शिक्षक संघाच्या नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी दीपक जाधव होते. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वैशाली वसंत घोंगडे यांची पालक-शिक्षक संघाच्या अध्यक्षा म्हणून, पुंडलिक पुंजाजी सोनवणे यांची उपाध्यक्षपदी, तर शंकर रंगनाथ भामेरे यांची सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपुरुष लोकमान्य टिळक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन सादर करून कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वैशाली वसंत घोंगडे यांनी केले. त्यांनी विद्यालयातील शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांची प्रगती, शिस्त, नियमित उपस्थिती तसेच पालकांच्या सहकार्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. एम. एच. बारी यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक आणि शिक्षकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
सभेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ, नियमित उपस्थिती, शिस्त, संस्कार, अभ्यासातील सातत्य, विविध शालेय उपक्रमांमध्ये सहभाग आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक बाबी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. पालकांनीही आपल्या सूचना व अपेक्षा मांडत विद्यालयाच्या प्रगतीसाठी शिक्षकांना सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
विद्यालय आणि पालक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी झाल्यास विद्यार्थ्यांच्या अडचणी वेळेत समजून घेऊन त्यावर योग्य मार्गदर्शन करता येते. त्यामुळे पालक-शिक्षक संघाच्या माध्यमातून शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
पालक-शिक्षक संघाची नवीन कार्यकारिणी
अध्यक्षा : वैशाली वसंत घोंगडे
उपाध्यक्ष : पुंडलिक पुंजाजी सोनवणे
सचिव : शंकर रंगनाथ भामेरे
सहसचिव : राजेंद्र चौधरी
सदस्य : गणेश गणगे, पी. आर. वानखेडे, दत्तात्रय सोनवणे, ए. ए. पाटील, सुवर्णा सोनवणे, गणेश गव्हाळे, हरीभाऊ राऊत, के. ए. बनकर, ज्योती सोनवणे, अशोक घोडके आणि एम. एच. बारी.
यावेळी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे, सचिव भगवान घोंगडे, संचालक लक्ष्मण गोरे, रामचंद्र वानखेडे यांच्यासह पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर भामेरे यांनी केले, तर बी. एन. जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



Post a Comment
0 Comments