Type Here to Get Search Results !

पत्नीच्या अंगावर दारू ओतून पेटवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न; पतीला अटक चारित्र्यावर संशय घेत मारहाण व जीवे मारण्याची धमकी; पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची कारवाई


दिशा लाईव्ह न्यूज-- : - पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी वाद घालून, अंगावर व कपड्यांवर दारू ओतत पेटवून देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २५ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजता वडगाव कडे परिसरात ही घटना घडली. पीडित विवाहित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिच्या पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी वाद घातला. यावेळी आरोपीने शिवीगाळ करत तिच्याशी मारहाण केली आणि तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी पतीने महिलेच्या अंगावर तसेच कपड्यांवर दारू ओतली. त्यानंतर माचीसची पेटती काडी तिच्या अंगावर फेकल्याने महिलेच्या कपड्यांनी अचानक पेट घेतला. आगीच्या झळांमुळे तिच्या हातासह मान, छाती आणि पोटाच्या भागावर गंभीर स्वरूपाच्या भाजलेल्या जखमा झाल्या.

महिलेच्या आरडाओरडाचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवून महिलेला वाचविले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. जखमी महिलेला उपचारासाठी तत्काळ पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

        गुन्हा दाखल; विविध कलमांन्वये कारवाई

या घटनेप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये सी.सी.टी.एन.एस. गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५६/२०२६ नोंदविण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १०९(१), ८५, ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३५१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची तपासणी

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने घटनास्थळाची वैज्ञानिक पद्धतीने तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान मिळालेल्या भौतिक पुराव्यांचे जप्ती पंचनामे करण्यात आले असून, प्रकरणातील पुरावे पोलिसांनी तपासासाठी घेतले आहेत.

उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपी राजू किशोर तडवी याला १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.१० वाजता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अटक केली. आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

        वैद्यकीय व फॉरेन्सिक अहवालाकडे लक्ष

या प्रकरणात जखमी महिलेचा वैद्यकीय अहवाल, घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेले पुरावे, फॉरेन्सिक अहवाल तसेच साक्षीदारांचे जबाब तपासासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. या सर्व बाबींच्या आधारे पुढील तपास केला जात आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा आणि उपनिरीक्षक राजू सांगळे यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे.

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीवर अशा प्रकारे जीवघेणा हल्ला केल्याच्या आरोपामुळे या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू असून, कौटुंबिक वाद किती गंभीर टोकाला जाऊ शकतो, याचे हे धक्कादायक उदाहरण ठरले आहे.




Post a Comment

0 Comments