Type Here to Get Search Results !

गोद्री धबधब्यावर भीषण दुर्घटना; बुलढाण्यातील २५ वर्षीय तरुणाचा दरीत कोसळून मृत्यू पाय घसरल्याने खोल दरीत पडला; मित्रांनी एक किलोमीटर उचलून आणले, उपचारादरम्यान मृत्यू



दिशा लाईव्ह न्यूज:- : पावसाळ्यात पर्यटकांचे आकर्षण ठरणाऱ्या जामनेर तालुक्यातील गोद्री धबधब्यावर मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) दुपारी दुर्दैवी दुर्घटना घडली. धबधब्याच्या परिसरात फिरण्यासाठी व पाण्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील २५ वर्षीय तरुणाचा पाय घसरून तो उंचावरून खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

आकाश सुनील पडघान (वय २५, रा. भादोला, जि. बुलढाणा) असे मृत तरुणाचे नाव आहे. आकाश हा पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने या घटनेमुळे पडघान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश हा आपल्या पाच ते सहा मित्रांसह गोद्री येथील धबधब्यावर पर्यटनासाठी आला होता. मंगळवारी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास धबधब्याच्या परिसरात पाऊस व पाण्याचा आनंद घेत असताना अचानक त्याचा पाय घसरला. त्यामुळे तो उंचावरून खाली खोल दरीत कोसळला.



अपघातानंतर त्याच्या शरीराला गंभीर दुखापत झाली. घटनेने घाबरलेल्या मित्रांनी प्रसंगावधान राखत आकाशला सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत उचलून बाहेर आणले. स्थानिक वन विभाग कर्मचाऱ्यांच्या मदतीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली. त्यानंतर त्याला तातडीने फत्तेपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

फत्तेपूर येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर आकाशची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. सायंकाळी सुमारे पाच वाजता त्याला जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

या घटनेमुळे आकाशच्या मित्रांना मोठा धक्का बसला असून, आपल्या डोळ्यांसमोर मित्राचा दुर्दैवी अंत झाल्याने त्यांना अश्रू अनावर झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात पोहोचून पंचनामा करण्याची प्रक्रिया केली.

आकाशच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे. घरातील एकुलता एक तरुण मुलगा गमावल्याने पडघान कुटुंबावर शोककळा पसरली असून, भादोला परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

           पर्यटकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

पावसाळ्यात धबधबे, नदी-नाले व डोंगराळ भागात पर्यटनासाठी जाताना पर्यटकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. पाण्याचा प्रवाह, निसरडी ठिकाणे आणि खोल दऱ्या यांचा अंदाज न आल्याने अशा दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments