Type Here to Get Search Results !

लोकहिताच्या लढ्याला आता संघटनेची ताकद! महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया विंगच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे निर्भीड पत्रकारितेची दखल; पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि अन्यायाविरोधात अधिक आक्रमकपणे लढणार



दिशा लाईव्ह न्यूज :- :  सर्वसामान्य, गोरगरीब आणि वंचित नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडत, लोकहिताच्या मुद्द्यांवर निर्भीडपणे आवाज उठविणारे तसेच प्रशासनातील गैरप्रकारांवर परखड भूमिका घेणारे TNP न्यूज सॅटेलाईट चॅनलचे पत्रकार चंदू भाऊ खरे (रा. कासमपुरा, ता. पाचोरा) यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया विंगच्या खान्देश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

चंदू भाऊ खरे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक गोरगरीब नागरिकांच्या समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. अन्याय, भ्रष्टाचार आणि गैरप्रकारांविरोधात निर्भीडपणे आवाज उठविणारा पत्रकार म्हणून त्यांनी जळगाव जिल्ह्यासह खान्देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

लोकहिताची बाजू ठामपणे मांडणारा पत्रकार

TNP न्यूज सॅटेलाईट चॅनलच्या माध्यमातून विविध सामाजिक, प्रशासकीय आणि जनहिताच्या प्रश्नांना त्यांनी प्रभावीपणे वाचा फोडली. कोणत्याही दबावाला न जुमानता निष्पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने त्यांच्यावर खान्देश पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.

दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी राज्य अध्यक्ष वसंतरावजी मुंडे यांच्या सूचनेनुसार चंदू भाऊ खरे यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

        पत्रकारांच्या अन्यायाविरोधात संघटित लढा

नवीन जबाबदारीच्या माध्यमातून पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी काम करण्यासोबतच पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात संघटितपणे आवाज उठविणे, पत्रकारांची एकजूट मजबूत करणे आणि संघटनेचा विस्तार व संघटनात्मक बांधणी अधिक प्रभावी करण्यासाठी चंदू भाऊ खरे प्रयत्नशील राहणार आहेत.

“पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याची जबाबदारी नसून समाजातील अन्यायाविरोधात आवाज उठविण्याचे प्रभावी माध्यम आहे,” या भावनेतून पुढील काळातही लोकहिताचे प्रश्न अधिक ताकदीने मांडण्याचा त्यांचा निर्धार आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने दिलेली ही जबाबदारी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि पारदर्शकपणे पार पाडून संघटनेचा विश्वास सार्थ ठरवू, असा विश्वास चंदू भाऊ खरे यांनी व्यक्त केला.

        !!!!!अभिनंदनाचा वर्षाव!!!!

चंदू भाऊ खरे यांच्या नियुक्तीबद्दल  दिशा लाईव्ह न्यूज परिवार,पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे खान्देशातील पत्रकारांच्या प्रश्नांना संघटित व्यासपीठ मिळून पत्रकारितेच्या क्षेत्रात आणखी प्रभावी काम उभे राहण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.




Post a Comment

0 Comments