दिशा लाईव्ह न्यूज :- : डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालय, लोहारा येथे देशाचा ८०वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात, देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचलनासह विविध देशभक्तीपर कार्यक्रमांनी विद्यालयाचा परिसर भारावून गेला.
शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. राजेंद्र शेळके यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय गीत, ‘वंदे मातरम्’ आणि राष्ट्रगीत ‘जन गण मन’ सादर करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राज्यगीत व झेंडागीताचेही प्रभावी सादरीकरण करण्यात आले.
यानंतर विद्यालयातील स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांनी आकर्षक संचलन व प्रात्यक्षिके सादर केली. गाईड विद्यार्थिनीच्या हस्ते स्काऊट-गाईड ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आर.एस.पी.चे पथसंचलन एन. एस. चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध पद्धतीने सादर केले.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कवायत व संचलनाचे मनमोहक सादरीकरण केले. या कार्यक्रमासाठी ए. एस. घोंगडे सर व ए. ए. बोरसे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या शिस्त, उत्साह आणि देशभक्तीची उपस्थित मान्यवरांनी विशेष प्रशंसा केली.
यावेळी विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक आर. के. सुरवाडे सर यांनी विद्यार्थी तसेच उपस्थित मान्यवरांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली. देशभक्तीसोबतच निरोगी व व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
कार्यक्रमाला विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष अ. अ. पटेल सर, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य डॉ. शेळके, डिगंबर नथ्थु चौधरी, सुरेश चौधरी, शिवराम भडके साहेब, उत्तमराव शेळके तसेच विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सौ. उज्वलाताई शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यालयाचे मुख्याध्यापक नानासो पी. एम. सुर्वे, उपमुख्याध्यापक आर. जी. बैरागी दादा, पर्यवेक्षक व्ही. व्ही. पाटील सर यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. एन. पाटील सर व ए. ए. बोरसे सर यांनी केले. तर ए. डी. गायकवाड सर यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे आभार मानले.
देशभक्ती, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालयाचा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात आणि अविस्मरणीय वातावरणात संपन्न झाला.


Post a Comment
0 Comments