Type Here to Get Search Results !

कर्मभूमीतच प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांचा विशेष सन्मान शैक्षणिक, सामाजिक, गोसेवा व पर्यटन क्षेत्रातील योगदानाची दखल; मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान


दिशा लाईव्ह न्यूज :- : शिक्षण, सामाजिक कार्य, गोसेवा तसेच पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे भुसावळ येथील कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांचा त्यांच्या कर्मभूमीत विशेष सन्मान करण्यात आला. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र डिजिटल न्यूज’तर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘भुसावळ जंक्शन’ या साप्ताहिकाच्या प्रकाशन समारंभात मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.

प्रा. डॉ. ललवाणी यांनी शैक्षणिक क्षेत्रात प्रदीर्घ काळ सेवा बजावताना विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले. निवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक बांधिलकी कायम ठेवत विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. ‘निसर्गाकडे चला’ हा संकल्प घेऊन ॲग्रो टुरिझम व रेस्टॉरंटच्या माध्यमातून त्यांनी पर्यटन क्षेत्रातही वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण जीवन, निसर्ग आणि पर्यावरणाशी नागरिकांना जोडण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय ठरला आहे.



शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठे आहे. विविध महाविद्यालयांना पुस्तके भेट देणे, सामाजिक व शैक्षणिक संस्थांना मदत करणे तसेच समाजोपयोगी उपक्रमांना आर्थिक व अन्य माध्यमातून सहकार्य करणे, अशा विविध उपक्रमांतून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. निगर्वी स्वभाव, संघर्षमय जीवनप्रवास आणि अनेक संकटांवर मात करून समाजसेवेचा घेतलेला वसा यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.

यावेळी प्रा. डॉ. नरेंद्र महाले यांनी प्रा. डॉ. ललवाणी यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. शिक्षण, गोसेवा, सामाजिक कार्य, दानशूर वृत्ती आणि पर्यटन क्षेत्रातील त्यांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रा. डॉ. ललवाणी यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळातील ३२ विद्यार्थिनींच्या प्रेरणादायी वाटचालीची माहिती ‘घरट्यातून आकाशाकडे’ या पुस्तकातून मांडल्याचा विशेष उल्लेख त्यांनी केला.

या कार्यक्रमास महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजय सावकारे, भुसावळचे पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, यावलच्या नगराध्यक्षा छाया पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. रजनी सावकारे, यावलचे नगरसेवक अतुल पाटील, भुसावळचे शिक्षण सभापती राजेंद्र आवटे, परीक्षेत बर्‍हाटे, पुरुषोत्तम नारखेडे तसेच बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

निवृत्त शिक्षक प्रमोद आठवले यांनीही आपल्या मनोगतातून प्रा. डॉ. ललवाणी यांच्या कार्याचा आवर्जून गौरव केला. त्यांच्या कार्यातील सातत्य, सामाजिक जाणिव आणि समाजासाठी काहीतरी देण्याची असलेली वृत्ती कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

सन्मानाला उत्तर देताना प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांनी ‘भुसावळ जंक्शन’ या साप्ताहिकाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बदलत्या माध्यमविश्वात डिजिटल माध्यमाने व्यापलेले व्यापक क्षेत्र आणि प्रिंट मीडियातील साप्ताहिकाचे महत्त्व यावर त्यांनी विचार व्यक्त केले. साप्ताहिकाचे संपादक गणेश वाघ यांच्या अथक परिश्रमांचेही त्यांनी कौतुक केले.

“अनेक संस्था आणि संघटनांनी आजवर माझा गौरव केला आहे. मात्र ज्या भुसावळ शहराला मी माझी कर्मभूमी मानतो, त्याच कर्मभूमीत माध्यम क्षेत्राच्या वतीने झालेला हा सन्मान माझ्यासाठी विशेष आनंदाचा आणि समाधानाचा आहे,” अशा भावना प्रा. डॉ. ललवाणी यांनी व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी आयोजकांसह उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.

प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांच्या या विशेष सन्मानाबद्दल हितचिंतक, मित्रपरिवार, आप्तस्वकीय आणि नातलगांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध क्षेत्रांतील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत कर्मभूमीत झालेला हा सन्मान त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाला मिळालेली कौतुकाची पावती ठरली आहे.



Post a Comment

0 Comments