Type Here to Get Search Results !

पहूर शहर पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी शरद बेलपत्रे उपाध्यक्षपदी ईश्वर हिवाळे यांची बिनविरोध निवड; विकासाभिमुख पत्रकारितेला प्राधान्य देण्याचा निर्धार


दिशा लाईव्ह न्यूज  --::--- पहूर, ता. जामनेर : पहूर शहर पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार शरद गंगाधर बेलपत्रे, तर उपाध्यक्षपदी माहिती अधिकार कार्यकर्ते ईश्वर भगवान हिवाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आगामी वर्षासाठी संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, सामाजिक बांधिलकी जपत विकासाभिमुख पत्रकारितेला प्राधान्य देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायतीच्या सभागृहात शहर पत्रकार संघटनेची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे होते. माजी अध्यक्ष मनोज जोशी यांनी प्रास्ताविकातून पत्रकारितेचे समाजातील महत्त्व आणि पत्रकार संघटनेची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन केले.

मावळते अध्यक्ष डॉ. संभाजी क्षीरसागर यांनी आपल्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. यामध्ये आरोग्य शिबिर, वक्तृत्व स्पर्धा तसेच विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश होता. या उपक्रमांना सहकार्य करणाऱ्या सर्व पत्रकारांचे त्यांनी आभार मानले.

त्यानंतर आगामी वर्षासाठी संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी शरद गंगाधर बेलपत्रे, उपाध्यक्षपदी ईश्वर भगवान हिवाळे, तर सचिवपदी महिला पत्रकार गीता भामेरे यांची निवड कायम ठेवण्यात आली.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्नेहवस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना सभाध्यक्ष शांताराम लाठे यांनी पत्रकारांनी संघटितपणे काम करून सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांना चालना देण्यासोबतच परिसरातील विकासाच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडावी, असे आवाहन केले.

यावेळी जयंत जोशी, रवींद्र लाठे, रवींद्र घोलप, सादिक शेख, गणेश पांढरे, वैभव लाठे यांच्यासह पहूर शहरातील पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments