Type Here to Get Search Results !

पहूर येथे जखमी माकडाला दिले जीवदान कुत्र्यांच्या तावडीतून सुटका; वनविभागाच्या पथकाची तत्पर कार्यवाही


पहूर, ता. जामनेर 

दिशा लाईव्ह न्यूज :-: अज्ञात वाहनाच्या धडकेने गंभीर जखमी झालेल्या माकडाला कुत्र्यांच्या तावडीतून वाचवत वनविभागाच्या पथकाने उपचार करून सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडल्याची हृदयस्पर्शी घटना जळगाव–छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील पहूर येथील बालाजी टोलकाट्याजवळ घडली. पहूरमधील संवेदनशील तरुणांनी दाखविलेली तत्परता आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेली तातडीची कार्यवाही यामुळे मुक्या जीवाला नवजीवन मिळाले.

प्राप्त माहितीनुसार, जळगाव–छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर एका अज्ञात वाहनाची धडक बसल्याने माकड जखमी होऊन रस्त्याच्या कडेला पडले होते. जखमी अवस्थेत असलेल्या या माकडावर परिसरातील काही कुत्र्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. माकडाला जीवाच्या आकांताने झुंज देताना पाहून परिसरातील भैय्या होळकर, ऋषी पाटील, विशाल चौधरी आणि पठाण कादर शेख यांनी प्रसंगावधान राखत तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

या तरुणांनी कोणतीही भीती न बाळगता कुत्र्यांना दूर करून जखमी माकडाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर माकडाची प्रकृती पाहता त्याला तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचे लक्षात आले. भैय्या होळकर यांनी विलंब न करता जामनेर वनक्षेत्र विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनक्षेत्रपाल सुरज आवारे, वनपाल सुरेश, वनरक्षक उमेश भारुडे, जीवन पाटील, सुनील पालवे तसेच ईश्वर हिवाळे यांनी घटनास्थळी पाहणी करून जखमी माकडाला ताब्यात घेतले.

वनविभागाच्या पथकाने जखमी माकडाला तातडीने पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी करून आवश्यक प्रथमोपचार व उपचार करण्यात आले. उपचारानंतर माकडाची प्रकृती स्थिर झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी माकडाला योग्य निगराणीखाली ठेवून पुढील कार्यवाही केली.

माकडाची प्रकृती सुधारल्यानंतर वनक्षेत्रपाल सुरज आवारे यांच्या नियंत्रणाखाली त्याला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. वनविभागाच्या पथकाने दाखविलेली तत्परता आणि स्थानिक तरुणांनी मुक्या जीवाला वाचविण्यासाठी घेतलेली धाव यामुळे एका वन्यजीवाचा जीव वाचला.

दरम्यान, महामार्गावर वाहनांच्या धडकेत वन्यप्राणी जखमी होण्याच्या घटना अधूनमधून घडत असल्याने वाहनचालकांनी महामार्गावरून प्रवास करताना विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे. तसेच जखमी अवस्थेत वन्यप्राणी आढळल्यास त्याला स्वतःहून त्रास न देता तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुक्या जीवाबद्दल माणुसकीची भावना जपत संकटाच्या वेळी मदतीसाठी धावून जाणाऱ्या पहूर येथील तरुणांचे परिसरातून कौतुक होत असून, वनविभागाच्या पथकाने केलेल्या तत्पर कार्यवाहीचेही नागरिकांकडून अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments