दिशा लाईव्ह न्यूज :-: दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, शेंदुर्णी येथे महाराष्ट्र उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘करिअर कट्टा’ उपक्रमाच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय *अविष्कार ओरिएंटेशन वर्कशॉप’*चे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी येथे होणार आहे.
दरवर्षी जिल्हा स्तरापासून विद्यापीठ, महाराष्ट्र, झोनल तसेच राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या ‘अविष्कार संशोधन स्पर्धे’साठी विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने तयार करणे, त्यांच्यामध्ये संशोधनाची आवड निर्माण करणे, सामाजिक प्रश्नांवर संशोधनाच्या माध्यमातून उपाय शोधण्याची दृष्टी विकसित करणे आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने संशोधनाचे सादरीकरण करण्याचे कौशल्य विकसित करणे, हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे.
अविष्कार स्पर्धेसाठी विषयाची निवड कशी करावी, संशोधनाची सुरुवात कोणत्या पद्धतीने करावी, संशोधन प्रकल्पाची मांडणी व सादरीकरण कसे असावे, स्पर्धेतील विविध टप्प्यांची तयारी कशी करावी, परीक्षकांच्या अपेक्षा काय असतात आणि स्पर्धेत यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये कोणती कौशल्ये विकसित करावीत, याबाबत विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन मिळणार आहे.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन
कार्यशाळेच्या प्रथम सत्रात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. दीपक दलाल मार्गदर्शन करणार आहेत.
द्वितीय सत्रात बामू विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. शुभम पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून, अन्वेषण स्पर्धेत भारतातून प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या त्यांच्या अनुभवाचा विद्यार्थ्यांना विशेष लाभ होणार आहे.
तृतीय सत्रात डॉ. योगिता चौधरी मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. चौधरी यांनी अविष्कार स्पर्धेत दोन वेळा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केला असून, संशोधन स्पर्धेची तयारी आणि सादरीकरणाबाबत त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना केवळ अविष्कार स्पर्धेची माहिती मिळणार नसून संशोधनाची दिशा, वैज्ञानिक दृष्टिकोन, नाविन्यपूर्ण विचार, समस्या सोडविण्याची क्षमता आणि प्रभावी सादरीकरण कौशल्य विकसित करण्यासाठीही मदत होणार आहे.
इतर महाविद्यालयांनी सहभागी व्हावे
शेंदुर्णी परिसरातील तसेच इतर महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः अविष्कार, अन्वेषण आणि संशोधन स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कार्यशाळा समन्वयक डॉ. योगिता चौधरी, आयक्यूएसी समन्वयक प्रा. दिनेश पाटील आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. बी. शेळके प्रयत्नशील आहेत.
संशोधनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभागी होऊन आपल्या संशोधन प्रवासाला योग्य दिशा द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments