Type Here to Get Search Results !

आमचे गुरुवर्य आदरणीय श्री.इ.ऐन. सावदेकर सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!



दिशा लाईव्ह न्यूज (दिनेश चौधरी, लोहारा) :--  काही शिक्षक फक्त विषय शिकवत नाहीत…

*ते विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देतात, शिस्त शिकवतात आणि नकळत त्यांच्या मनावर आयुष्यभरासाठी संस्कार करून जातात.**

*आमचे गुरुवर्य आदरणीय श्री. सावदेकर सर हे त्यापैकीच एक!*

तो बहुधा १९८२ च्या आसपासचा काळ… त्या वेळी आमची शाळा ‘न्यू इंग्लिश स्कूल’ या नावाने ओळखली जायची. त्या काळातील सरांची शिकवण्याची पद्धत आजही डोळ्यांसमोर उभी राहते. सर आम्हाला रसायनशास्त्र, बीजगणित आणि भूमिती हे विषय शिकवत असत.

*अत्यंत शिस्तबद्ध, काटेकोर आणि तितक्याच प्रेमळ पद्धतीने शिकवणारे सर म्हणजे आमच्यासाठी एक वेगळेच विद्यापीठ होते.*

 वर्गात शिकवताना प्रत्येक विद्यार्थ्याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असायचे. कोणाला विषय समजला आहे का? कोण मागे राहतोय का? कोणाला पुन्हा समजावून सांगण्याची गरज आहे का? याचा सर सातत्याने विचार करायचे.




*गणित आणि भूमिती हे विषय अनेक विद्यार्थ्यांना कठीण वाटायचे;* पण सरांच्या शिकवण्यामुळे ते विषय समजायला लागायचे. एखादी संकल्पना विद्यार्थ्याच्या डोक्यात पूर्णपणे रुजत नाही तोपर्यंत सरांची शिकवण्याची तळमळ थांबत नसे. *अक्षरशः घाम फुटेपर्यंत शिकवणारा शिक्षक आम्ही अनुभवला आहे.*

त्यांच्या शिकवण्यात कधी कठोरपणा जाणवायचा, पण त्या कठोरपणामागे विद्यार्थ्यांविषयी असलेले निखळ प्रेम आणि त्यांना घडवण्याची प्रामाणिक तळमळ होती. 

*आज मागे वळून पाहताना जाणवतं की, त्या वेळी सरांनी दिलेली शिस्त, अभ्यासाची सवय आणि विषयाकडे पाहण्याची दृष्टी ही आमच्या आयुष्याची मोठी शिदोरी ठरली.*


आज काळ बदलला… शाळा बदलल्या… शिकवण्याच्या पद्धती बदलल्या… अनेक शिक्षक आयुष्यात आले आणि गेले; पण काही शिक्षकांच्या आठवणी मात्र मनातून कधीच जात नाहीत. *सावदेकर सर हे आमच्यासाठी असेच एक अढळ व्यक्तिमत्त्व आहेत.*


सरांचा वर्ग, सरांचा आवाज, शिकवण्याची पद्धत, विद्यार्थ्यांकडे पाहण्याची नजर आणि एखादा विषय समजावून सांगताना त्यांची असलेली तळमळ… हे सगळं आजही आठवलं की मन नकळत त्या जुन्या शाळेच्या दिवसांत जाऊन पोहोचतं.

शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं हे केवळ वर्गापुरतं मर्यादित नसतं. खरा शिक्षक विद्यार्थ्याच्या मनात कायमचा राहतो. वर्षानुवर्षे भेट झाली नाही तरी त्यांच्याविषयीचा आदर कमी होत नाही. *उलट काळ जसजसा पुढे जातो, तसतसं त्या शिक्षकांचे महत्त्व अधिक जाणवू लागते.*

आमच्या आयुष्यात अशा अनेक आठवणींची सुंदर शिदोरी देणाऱ्या, शिस्तप्रिय, प्रेमळ, कर्तव्यनिष्ठ आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याची मनापासून काळजी घेणाऱ्या आमच्या लाडक्या गुरुवर्य सावदेकर सरांचा आज वाढदिवस!

सर, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक *शुभेच्छा!* 💐🎂🙏

*आई जगदंबेच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना की,*

*आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य,* *आनंद, समाधान आणि निरोगी आयुष्य लाभो.* *आपल्या आयुष्याचा प्रत्येक दिवस आनंदाने, प्रेमाने आणि समाधानाने भरलेला असो.*


*आपण आम्हाला दिलेले ज्ञान, शिस्त आणि संस्कार हीच आमच्यासाठी आपली सर्वात मोठी भेट आहे.*

*आम्ही आपले विद्यार्थी आहोत, याचा आम्हाला आजही अभिमान आहे… आणि पुढेही कायम राहील!*❤️🙏

🌹 *गुरुवर्य आदरणीय श्री. सावदेकर सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!* 🌹

*शुभेच्छुक —*

*दिनेश चौधरी, लोहारा (मेणगावकर)*

Post a Comment

0 Comments