पहूर, ता. जामनेर
दिशा लाईव्ह न्यूज :-: ग्रामीण भागातील जिल्हा परिषद मराठी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेबद्दल गोडी निर्माण व्हावी, तसेच त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पेलिंग बी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्हा परिषद केंद्र शाळा, पहूर पेठ येथे शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी दुपारी केंद्रस्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेचा प्रारंभ झाला. केंद्रप्रमुख भानुदास तायडे यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे दैनंदिन जीवनातील महत्त्व समजावून सांगितले.
सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे इंग्रजी विषय शिक्षक शंकर भामेरे यांनी स्पर्धेचे नियम व अटी सांगून मातृभाषेसोबतच इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व मिळविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमधून प्रत्येकी दोन विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना सोपे, मध्यम आणि कठीण अशा तीन स्तरांवर इंग्रजी शब्दांचे अचूक स्पेलिंग सांगण्याची संधी देण्यात आली. चार गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेचे परीक्षण महेश मोरे, उमाकांत तळेले, मनीषा राऊत आणि शंकर भामेरे यांनी केले.
स्पर्धेचा निकाल
गट क्रमांक १ (इयत्ता पहिली व दुसरी)
प्रथम क्रमांक – खुशी समाधान करंकार
द्वितीय क्रमांक – देवयानी किशोर भडांगे
गट क्रमांक २
प्रथम क्रमांक – कौस्तुभ राजू थोरात
द्वितीय क्रमांक – विवेक खैरू तडवी
गट क्रमांक ३
प्रथम क्रमांक – प्रीती संतोष पांढरे
द्वितीय क्रमांक – तन्वी विठ्ठल चव्हाण
गट क्रमांक ४
प्रथम क्रमांक – प्रवीण बंडू पवार
द्वितीय क्रमांक – प्रणिता दत्तू घोंगडे
यावेळी केंद्रातील शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजेत्या विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित परीक्षकांचाही केंद्रातर्फे सत्कार करण्यात आला.
विजेत्या स्पर्धकांची तालुकास्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेसाठी निवड झाल्याने केंद्रप्रमुख भानुदास तायडे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी जिल्हा परिषद केंद्र शाळेचे मुख्याध्यापक शंकर जाधव यांनी सहकार्य केले.
परीक्षक महेश मोरे यांनी निकाल जाहीर केला.
गोकुळ महाजन यांनी आभार मानले.


Post a Comment
0 Comments