Type Here to Get Search Results !

पहूर येथे संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी सोहळा; हरिकीर्तन व महाप्रसादाचे आयोजन


पहूर, ता. जामनेर

दिशा लाईव्ह न्यूज :-- : संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पहूर कसबे येथे नाभिक समाज मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भक्तिमय वातावरणात संत सेना महाराजांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

पहूर कसबे गावाच्या प्रवेशद्वाराजवळील श्री समर्थ विठ्ठल मंदिराच्या नवीन सभागृहात पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संत सेना महाराज यांनी आपल्या अभंग व भक्तीपर विचारांतून समाजाला मानवता, समता, बंधुभाव आणि सदाचाराचा संदेश दिला. त्यांच्या कार्याचे स्मरण करून उपस्थित भाविकांनी संत सेना महाराजांना अभिवादन केले.

पुण्यतिथीनिमित्त गावातून टाळ-मृदंगाच्या गजरात संत सेना महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या पालखी सोहळ्यात समाजबांधव, ग्रामस्थ, टाळकरी तसेच विविध भजनी मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ‘विठ्ठल नामाचा’ जयघोष आणि भक्तिगीतांमुळे परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता.

यावेळी हरिकीर्तनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. कीर्तनातून संत सेना महाराजांचे जीवनकार्य, त्यांचे सामाजिक योगदान तसेच मानवतावादी व समतेचे विचार यावर प्रकाश टाकण्यात आला. उपस्थित भाविकांनी कीर्तनाचा लाभ घेतला.

कार्यक्रमाच्या सांगतेनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

संत सेना महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यामुळे पहूर कसबे येथे दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाभिक समाज मंडळाचे पदाधिकारी, समाजबांधव आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments