पहूर, ता. जामनेर.
दिशा लाईव्ह न्यूज ::--: : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांकडून जामनेर तालुक्यात विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. ७ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता जामनेर, पहूर आणि फत्तेपूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी ही मोहीम राबविण्यात आली.
या विशेष मोहिमेदरम्यान तिन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील १८९ रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करण्यात आली. दारूबंदी कायद्यान्वये १९ प्रकरणांमध्ये कारवाई करून सुमारे ५ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच न्यायालयीन प्रक्रियेत आवश्यक असलेल्या ५ आरोपींविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट (NBW) बजावण्यात आले.
कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान संशयास्पद आढळून आलेल्या ५२ मोटारसायकली व एका रिक्षेसह एकूण ५३ वाहने ताब्यात घेण्यात आली. या वाहनांची आरटीओ कार्यालयामार्फत तपासणी व पडताळणी सुरू असून, अहवालानंतर नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
पोलिस ठाणेनिहाय कारवाई
जामनेर पोलिस ठाणे : ७२ रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करण्यात आली. दारूबंदी कायद्यान्वये ६ कारवाया करून १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पहूर पोलिस ठाणे : ६४ रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करण्यात आली. दारूबंदी कायद्यान्वये १० कारवाया करून २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच ४ आरोपींविरुद्ध NBW बजावण्यात आले.
फत्तेपूर पोलिस ठाणे : ५३ रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करण्यात आली. दारूबंदी कायद्यान्वये ३ कारवाया करून १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय एका आरोपीविरुद्ध NBW बजावण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी प्यारे बिस्मारे यांच्यासह जामनेर, पहूर व फत्तेपूर पोलिस ठाण्यांतील अधिकारी व अंमलदारांनी केली.
आगामी सण-उत्सवांच्या काळात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी तसेच अवैध धंदे व गुन्हेगारी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाया यापुढेही सुरू राहतील, असा इशारा पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Post a Comment
0 Comments