सुनील लोहार -कुऱ्हाड, ता. पाचोरा
दिशा लाईव्ह न्यूज : कुऱ्हाड खुर्द येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत शिक्षकांची मोठी कमतरता असल्याने तब्बल ३०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी किमान ८ ते १० शिक्षकांची आवश्यकता असताना सध्या या शाळेत केवळ तीन शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे उपलब्ध शिक्षकांवर अध्यापनाचा प्रचंड ताण पडत असून, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी शिक्षकांची मोठी दमछाक होत आहे.
कुऱ्हाड खुर्द येथील मोहल्ला परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ही जिल्हा परिषद उर्दू शाळा अत्यंत महत्त्वाची आहे. या शाळेत पहिली ते सातवीपर्यंत सुमारे ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मोठी पटसंख्या असलेल्या या शाळेत विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षकांची संख्या अत्यंत कमी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एका शिक्षकाला एकापेक्षा अधिक वर्गांची जबाबदारी सांभाळावी लागत आहे.
दोन-दोन वर्ग एकत्र घेण्याची वेळ
शिक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी काही वर्गातील विद्यार्थ्यांना एकत्र बसवून अध्यापन करण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. विशेषतः पहिली व दुसरीचे वर्ग एकत्र घेणे, तसेच इतर वर्गांमध्येही उपलब्ध शिक्षकांच्या नियोजनानुसार सामुदायिक पद्धतीने अध्यापन करावे लागत आहे. परिणामी प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणे शिक्षकांना कठीण होत आहे.
लहान वयातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा भक्कम पाया मिळणे अत्यंत आवश्यक असते. मात्र शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता पालकांकडून व्यक्त केली जात आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शंका सोडविणे, गृहपाठ तपासणे, मूल्यमापन करणे, शालेय उपक्रम राबविणे आदी अतिरिक्त कामांचाही भार या तीन शिक्षकांवर पडत आहे.
शाळा व्यवस्थापन समितीचे प्रयत्न सुरू
शाळेतील शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांची मोठी पटसंख्या लक्षात घेऊन शाळेला आवश्यक शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी संबंधित शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशपाक काकर यांनी सांगितले की, शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी समितीच्या सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगाव तसेच मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन शाळेला तातडीने आवश्यक शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तीन शिक्षकांवर मोठी जबाबदारी
उर्दू शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक जुबेर बेग यांनी सांगितले की, "शाळेत सुमारे ३०० विद्यार्थी असून त्यांना शिकविण्यासाठी सध्या केवळ तीन शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे दोन-दोन वर्ग एकत्र बसवून अध्यापन करावे लागत आहे. शाळेची पटसंख्या चांगली असल्याने किमान ८ ते १० शिक्षकांची आवश्यकता आहे. शिक्षकांची संख्या वाढल्यास विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे अध्यापन करता येईल तसेच प्रत्येक वर्गाकडे स्वतंत्रपणे लक्ष देता येईल."
शिक्षक नियुक्तीची पालकांची मागणी
शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या पाहता शासनाच्या नियमानुसार आवश्यक शिक्षक उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे. शिक्षकांची कमतरता कायम राहिल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने या प्रश्नाकडे केवळ प्रशासकीय बाब म्हणून न पाहता विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित गंभीर प्रश्न म्हणून पाहावे, अशी मागणी होत आहे.
३०० विद्यार्थ्यांसाठी केवळ तीन शिक्षक ही परिस्थिती बदलून प्रत्येक वर्गाला पुरेसे शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, अशी अपेक्षा पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. आता शिक्षण विभाग या मागणीची दखल घेऊन कुऱ्हाड खुर्द येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेला तातडीने आवश्यक शिक्षक उपलब्ध करून देतो का, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment
0 Comments