Type Here to Get Search Results !

द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने २९ सप्टेंबरला ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळा’


दिशा लाईव्ह न्यूज :- : ग्रामीण भागातील पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी द युवा ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळा २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. संघाच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त हा विशेष सोहळा मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील प्रश्न, विकासाच्या समस्या आणि जनतेच्या विविध मागण्या प्रभावीपणे शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविण्यात ग्रामीण पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असते. ‘लेखणी जनतेच्या हक्कासाठी’ या विचाराला केंद्रस्थानी ठेवून द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य कार्यरत असून, ग्रामीण पत्रकारितेला बळकटी देण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींच्या कार्याला व्यासपीठ मिळवून देण्याचा संघाचा प्रयत्न आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन समाज कल्याण अधिकारी, पुणे श्री. मनोज विठ्ठल जाधव यांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमाला ह.भ.प. श्रीनाथ महाराज गोसावी, शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज, तसेच ह.भ.प. रमेश महाराज वसेकर, श्री संत शिरोमणी सावता महाराजांचे १८ वे वंशज, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

तसेच कार्यक्रमास ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे, मा. अध्यक्ष–जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान, अॅड. सागर शिंदे, संपादक–दैनिक सार्वभौम, श्री. अशोकराव उमरगोंकर, मा. नगराध्यक्ष–आळंदी नगरपालिका आणि श्री. अनंत कराड, संस्थापक अध्यक्ष–ऐकता फाउंडेशन, आदी मान्यवरांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे.

        पुण्यातील डांगे पंच मंगल कार्यालयात आयोजन.

हा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे स्थळ डांगे पंच मंगल कार्यालय, देवाची आळंदी, (चाकण चौक), पुणे असे आहे.

ग्रामीण पत्रकारिता ही केवळ बातमी प्रसारित करण्याचे माध्यम नसून, ग्रामीण जनतेचा आवाज, त्यांच्या समस्या आणि हक्क शासनापर्यंत पोहोचविणारे प्रभावी व्यासपीठ असल्याचे संघाच्या वतीने सांगण्यात आले. पत्रकारिता आणि समाजसेवा यांचा समन्वय साधत ग्रामीण भागाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा सन्मान करणे हा या सोहळ्यामागील मुख्य उद्देश आहे.

‘गावागावातून बातमी... समाज बदलाची!’, तसेच ‘पत्रकारिता हीच समाजसेवा’ या विचाराने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास ग्रामीण पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन द युवा ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य, स्वस्थापक अध्यक्ष,राज्य अध्यक्ष, राज्य सचिव  यांच्यासह सर्व पदाधिकारी,जिल्हाध्यक्ष व सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : ९९६०१६८६७१.

Post a Comment

0 Comments