Type Here to Get Search Results !

लोहारा येथे घरफोडी; १ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास! चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल !!पोलीस प्रशासनासमोर चोरट्यांचे मोठे आव्हान!! पोलिसांनी तपास लावण्यासाठी कंबर कसावी- नागरिकांची मागणी.



  दिशा लाईव्ह न्यूज -:- पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोहारा  येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२.१५ ते पहाटे ५ वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे लोहारा आणि परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोहारा येथील रहिवासी जलीम अहमद सुभान गनी शेख (वय ५०) यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. घरातील कपाट व इतर ठिकाणी ठेवलेल्या वस्तूंची पाहणी करून चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने तसेच शेतीमाल विक्रीतून घरात ठेवलेली रोख रक्कम लंपास केली.

              सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड चोरीला

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये १४ ग्रॅम वजनाचा सोन्याचा राणीहार, १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा साधा हार आणि २.५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी यांचा समावेश आहे. तसेच चांदीचे कडे, चांदीची चैन, चांदीची बांगडी आणि चांदीची अंगठी असा चांदीचा ऐवजही चोरट्याने लंपास केला.

याशिवाय शेतीमाल विक्रीतून घरात ठेवलेली १ लाख २४ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम चोरीस गेली. सोन्या-चांदीचे दागिने व रोकड मिळून एकूण १ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

                 अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी जलीम अहमद सुभान गनी शेख यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३९/२०२६ नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) व ३३१(४) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

            पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे तपास अधिकारी

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपासाला सुरुवात केली. घटनास्थळावरून आवश्यक पुरावे संकलित करण्यात आले असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशांनी तपास सुरू आहे.

या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे काम पाहत आहेत. चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यासाठी तसेच अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली आहेत.

              रात्रीची गस्त वाढविण्याची ग्रामस्थांची मागणी

लोहार परिसरात घरफोडीची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढवावी, संशयित व्यक्ती व वाहनांची तपासणी करावी तसेच चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

विशेषतः गावाच्या बाहेरील भागात, शेतवस्त्यांमध्ये तसेच रात्रीच्या वेळी वर्दळ कमी असलेल्या परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या घरफोडीचा तातडीने छडा लावून अज्ञात चोरट्यांना जेरबंद करावे आणि चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.



दिनेश सोनजी चौधरी.

संपादक-:-दिशा लाईव्ह न्यूज.

Post a Comment

0 Comments