Type Here to Get Search Results !

ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र नाना नेहेते यांचे आज सकाळी निधन पत्रकारितेतील अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार; जळगाव जिल्हा पत्रकार संघाचा आधारस्तंभ हरपला



दिशा लाईव्ह न्यूज :-: दैनिक बातमीदारचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार तथा जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे विश्वस्त आणि आधारस्तंभ नरेंद्र नाना नेहेते (वय ७४) यांचे सोमवारी (दि. २८ सप्टेंबर) सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने जळगावच्या पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

नरेंद्र नाना नेहेते यांनी आपल्या प्रदीर्घ पत्रकारितेच्या कारकिर्दीत जळगाव शहरासह जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रांतील घडामोडींचे जवळून वार्तांकन केले. जळगाव शहरातील पत्रकारितेच्या प्रवासातील अनेक ऐतिहासिक घटनांचे ते साक्षीदार आणि जाणकार होते. आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटविला.

ज्येष्ठ पत्रकारांच्या प्रश्नांसाठीही ते सातत्याने आग्रही राहिले. ज्येष्ठ पत्रकारांना शासनाकडून मिळणारे मानधन त्यांच्या हयातीत अखेरपर्यंत मिळू शकले नाही, ही बाब पत्रकारिता क्षेत्रासाठी वेदनादायी असल्याची भावना व्यक्त होत आहे. ज्येष्ठ पत्रकारांच्या प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे हे एक उदाहरण असल्याची प्रतिक्रिया पत्रकार वर्तुळातून व्यक्त होत आहे.

नरेंद्र नाना नेहेते यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच पत्रकारिता क्षेत्रातील सहकारी असा मोठा परिवार आहे.

त्यांची अंत्ययात्रा सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ८ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघणार आहे.

जळगाव जिल्हा पत्रकार संघ,तसेच द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संघाने स्व नरेंद्र नाना नेहेते यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करून त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments