Type Here to Get Search Results !

लोहारा आणि परिसरात चोरी सत्र थांबेना. लागोपाठ चोरी सत्राने नागरिक व शेतकरी हैराण.. शेतकऱ्याच्या शेतात चोरट्यांचा धुमाकूळ! सोलर बोअरवेलची ८० फूट केबल लंपास. चार वर्षांपासून मोटार-वायर चोरीचे सत्र; पोलीस स्टेशनला वारंवार तक्रारी करूनही शेतकरी त्रस्त —की चोरांना अभय कुणाचे? लोहारा पोलिसांकडून ठोस कारवाईची मागणी.


दिशा लाईव्ह न्यूज -:--लोहारा, ता. पाचोरा येथे शेतकऱ्यांच्या शेतमालावर डोळा ठेवणाऱ्या चोरट्यांनी आता थेट सोलर बोअरवेलच्या केबलवर हात साफ करण्यास सुरुवात केली आहे. लोहारा परिसरातील शेतकरी गोकुळ लोटू चौधरी यांच्या शेतातील सोलर बोअरवेल पंपाची तब्बल ८० फूट केबल चोरट्यांनी कापून लंपास केल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी रात्री घडली. या प्रकारामुळे शेतातील पाणीपुरवठा ठप्प झाला असून पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.

गोकुळ चौधरी यांच्या लोहारा-काळी शिवारा परिसरातील गट क्रमांक ४१५ मधील शेतात सोलर बोअरवेल बसविण्यात आले आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सोलर पंपाची केबल कापून नेली. तसेच पंपासंबंधित वायरचीही चोरी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

                           चार वर्षांपासून चोरीचा छळ!

धक्कादायक बाब म्हणजे हा काही पहिलाच प्रकार नसून गेल्या चार वर्षांपासून शेतातील मोटार आणि वायर चोरीला जाण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. यापूर्वीही शेतातील मोटार व वायर चोरीला गेल्याचे चौधरी यांनी पोलिसांना दिलेल्या अर्जात नमूद केले आहे. त्यानंतर २४ ऑगस्ट २०२६ रोजीही वायर चोरीला गेल्याची घटना घडली होती. या घटनेबाबत पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.


एकीकडे पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी पिके वाचविण्यासाठी धडपडत असताना दुसरीकडे शेतातील पाणीपुरवठ्याची साधनेच चोरट्यांकडून लंपास केली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्याने कष्टाने उभ्या केलेल्या पिकांना पाणी कसे द्यायचे? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

तक्रारीनंतरही चोरट्यांना मोकळे रान?की चोरट्यांना कुणाचे अभय?

वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.अगोदरच शेतकरी आर्थिक संकटात असतांना लोहारा आणि परिसरात चोरट्यानी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मोटार, केबल आणि वायर चोरीमुळे शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा आर्थिक फटका बसत असून प्रत्येक वेळी नवीन साहित्य बसविण्याचा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.


गोकुळ चौधरी यांनी लोहारा पोलिसांकडे तक्रार अर्ज देत चोरीच्या घटनांची सखोल चौकशी करून अज्ञात चोरट्यांचा शोध आतातरी त्वरित घ्यावा.   चोरीस गेलेले साहित्य मिळवून द्यावे आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

                शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर?

शेतांमध्ये रात्रीच्या वेळी चोरट्यांचा वावर वाढत असल्याची भावना परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आहे. मोटार, केबल, सोलर पंपाचे साहित्य यासारख्या वस्तू वारंवार चोरीला जात असल्याने शेतकरी आपल्या शेताची आणि साहित्याची राखण करणार की पिकांची? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

लोहारा परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.



Post a Comment

0 Comments