पहूर, ता. जामनेर
दिशा लाईव्ह न्यूज :-: जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथे पोळा सणाला ऐतिहासिक आणि पारंपरिक महत्त्व आहे. वाघूर नदीच्या तीरावर वसलेल्या या गावाच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग असलेला पोळा दरवाजा अर्थात वेशी दरवाजा यंदाही पाहायला मिळणार नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. विकासाच्या नावाखाली महादेव मंदिरालगतची भिंत व ओटा पाडून प्रस्तावित ग्रामद्वारासाठी जागा मोकळी करण्यात आली; मात्र दीड वर्षाचा कालावधी उलटूनही ग्रामद्वाराचे काम सुरू न झाल्याने सलग दुसऱ्या वर्षीही पहूरचा पोळा वेशी दरवाजाविनाच साजरा होणार आहे.
कृषीप्रधान संस्कृतीत पोळा सणाला विशेष महत्त्व आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण पहूर येथे पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला जातो. महादेव मंदिर, हनुमान मंदिर आणि समर्थ विठ्ठल मंदिर परिसरातील वेशी दरवाजाला या परंपरेत विशेष स्थान आहे. पोळ्याच्या दिवशी सजविलेल्या बैलांच्या मिरवणुकीसह ग्रामस्थांच्या उत्साहाला या ऐतिहासिक प्रवेशद्वारामुळे एक वेगळीच शोभा प्राप्त होत असे.
विकासाच्या नावाखाली भिंत पाडली; काम मात्र रखडले
गावाच्या प्रवेशद्वारावर भव्य आणि आकर्षक ग्रामद्वार उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल्यानंतर महादेव मंदिरालगतचा ओटा व त्याची भिंत पाडण्यात आली. त्यावेळी लवकरच नवीन ग्रामद्वार उभारले जाईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली होती. मात्र दीड वर्षाचा कालावधी लोटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसल्याने ग्रामद्वाराचा प्रश्न अद्याप प्रलंबितच आहे.
यामुळे “ग्रामद्वार कधी साकारणार?” असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. विकासकामासाठी जुनी वास्तू हटविण्यात आली; मात्र त्यानंतर प्रस्तावित कामाला गती न मिळाल्याने परिसराचे विद्रूपीकरण झाल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
भग्न अवस्थेमुळे सुरक्षिततेचा प्रश्न
पाडण्यात आलेल्या ओट्याची व भिंतीची जागा सध्या भग्न अवस्थेत असून, हा परिसर नागरिकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. विशेषतः लहान बालके, ज्येष्ठ नागरिक तसेच मंदिरात येणारे भाविक यांना या ठिकाणी वावरताना काळजी घ्यावी लागत आहे. प्रशासनाने केवळ प्रस्ताव जाहीर न करता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून परिसर सुरक्षित करावा, अशी मागणी होत आहे.
परंपरा जपण्याची ग्रामस्थांची अपेक्षा
पहूरच्या पोळ्याला लाभलेली ऐतिहासिक परंपरा आणि गावाची सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी वेशी दरवाजाचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे प्रस्तावित ग्रामद्वाराचे काम तातडीने पूर्ण करून पोळा सणाच्या परंपरेला साजेसे प्रवेशद्वार उभारावे, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
यंदाचा पोळा सण वेशी दरवाजाविनाच साजरा होणार असल्याने रखडलेल्या ग्रामद्वाराच्या कामाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासन याबाबत आता ठोस पाऊल उचलणार का, याकडे पहूरवासीयांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment
0 Comments