दिशा लाईव्ह न्यूज :-:- : उमेद अभियान, कृषी विभाग आणि पानी फाऊंडेशन यांच्या संयुक्त समन्वयातून राबविण्यात येत असलेल्या फार्मर कप चळवळीला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील फार्मर कप संवाद बैठक उत्साहात संपन्न झाली. उमेद अभियानाचे अवर सचिव श्री. धनवंत माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील उमेद अभियानाचे सर्व मेंटर्स, विविध तालुक्यांतील बीएमएम, प्रभाग समन्वयक तसेच जिल्हास्तरीय अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
बैठकीस प्रकल्प संचालक श्री. राजू लोखंडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री. हरेश्वर भोई, DM Livelihood अधिकारी श्री. सुशिल पाटील, IBCB जिल्हा व्यवस्थापक श्री. चंद्रकांत सोनवणे तसेच पानी फाऊंडेशनचे विभागीय समन्वयक श्री. राजेश हिवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गटशेतीची चळवळ म्हणजे पुण्याचे काम : धनवंत माळी
यावेळी मार्गदर्शन करताना श्री. धनवंत माळी यांनी फार्मर कप चळवळीतील कामाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रशासकीय कामासोबतच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना एकत्र आणून गटशेतीची चळवळ मजबूत करण्याचे काम अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
भावनिक साद घालत त्यांनी गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणाऱ्या विविध उदाहरणांचा आणि अनुभवांचा उल्लेख केला. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांच्या उन्नतीसाठी आपण करीत असलेले काम हे केवळ शासकीय जबाबदारी नसून समाजहिताचे आणि पुण्याचे काम आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
आपल्या ओघवत्या शैलीतील मार्गदर्शनातून त्यांनी फार्मर कप चळवळीतील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकत उपस्थितांना प्रेरित केले.
एकजुटीने चळवळ प्रत्येक शेतकरी कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन
उमेद अभियानातील महिला बचत गटांची चळवळ ग्रामीण भागातील घराघरापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे या मजबूत नेटवर्कच्या माध्यमातून फार्मर कप चळवळही प्रत्येक महिला शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचविण्याची मोठी संधी आपल्यासमोर आहे, असे माळी यांनी सांगितले.
एकजुटीने, समन्वयाने आणि आनंदाने काम केल्यास फार्मर कप चळवळीला अधिक व्यापक स्वरूप देता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उमेद अभियानाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या चळवळीचा प्रभावी उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित मेंटर्स व अधिकाऱ्यांना केले.
उमेद, कृषी विभाग आणि पानी फाऊंडेशनच्या एकजुटीत ग्रामीण विकासाची ताकद
उमेद विभाग, कृषी विभाग आणि पानी फाऊंडेशन या तीनही यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम केल्यास ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडविण्याची ताकद या एकजुटीत आहे, असे श्री. माळी यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना केवळ योजनांचा लाभ देण्यापेक्षा त्यांना संघटित करून, परस्पर अनुभवांची देवाणघेवाण घडवून आणत सामूहिक शेतीच्या माध्यमातून त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
मेंटर्सची संख्या वाढविण्याच्या सूचना
फार्मर कप चळवळीचे काम सुरुवातीला नवीन असल्याने विविध स्तरांवर काही अडचणी आल्या. मात्र, आता या कामाचा तसेच SOP कॉलचा चांगला अनुभव सर्वांना प्राप्त झाला आहे. त्यामुळे पुढील टप्प्यात अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज असल्याचे माळी यांनी सांगितले.
ज्या तालुक्यांमध्ये उमेद अभियानाचे मेंटर्स कमी झाले आहेत किंवा उपलब्ध नाहीत, त्या ठिकाणी नव्याने मेंटर्सची नियुक्ती करून चळवळीला गती देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.
यामुळे जळगाव जिल्ह्यातील ज्या तालुक्यांमध्ये सध्या उमेदचे मेंटर्स उपलब्ध नाहीत, तेथेही जबाबदारी स्वीकारण्यासाठी उमेदचे मेंटर्स उत्साहाने पुढे येत असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले.
महिला गटांच्या शेतावर जाऊन माळी यांनी साधला संवाद
संवाद बैठकीनंतर श्री. धनवंत माळी यांनी जळगाव तालुक्यातील काही महिला गटांना त्यांच्या शेतावर तसेच गावात प्रत्यक्ष भेटी देऊन संवाद साधला. महिला गटांकडून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती घेतली आणि त्यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.
शेतकरी महिला गटांनी सामूहिक प्रयत्नातून शेतीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणावा, तसेच फार्मर कप चळवळीच्या माध्यमातून अधिकाधिक शेतकरी कुटुंबांना जोडावे, असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी “पानी फाऊंडेशनची साथ कधीही सोडू नका”, असे आवाहन करत त्यांनी महिला गटांच्या कामाला सातत्याने सहकार्य आणि प्रोत्साहन देण्याची भूमिका स्पष्ट केली.
ग्रामीण परिवर्तनासाठी समन्वयाची नवी दिशा
जळगाव जिल्ह्यातील फार्मर कप संवाद बैठकीमुळे उमेद अभियानातील अधिकारी, मेंटर्स, महिला गट आणि पानी फाऊंडेशन यांच्यातील समन्वयाला अधिक बळ मिळाले. शेतकऱ्यांना संघटित करून गटशेतीला चालना देणे, महिला शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे आणि ग्रामीण कुटुंबांच्या आर्थिक सक्षमीकरणाला गती देणे, या उद्दिष्टांसाठी आगामी काळात अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.




Post a Comment
0 Comments