Type Here to Get Search Results !

वाकडी,शेंगोळा, फत्तेपूर येथे नामदार गिरीश महाजन यांची पिक पाहणी “शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही; दिवाळीपूर्वी मदत देऊ” — गिरीश महाजन



दिशा लाईव्ह न्यूज :- : जामनेर तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तथा जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, पिकांचे नुकसान आणि आर्थिक संकटाची माहिती जाणून घेतली.

“राज्य शासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अतिशय संवेदनशील आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल,” अशी ग्वाही मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी दिली.

नामदार महाजन यांनी जामनेर तालुक्यातील शेंगोळा, कर्ण फाटा, वाकडी, फत्तेपूर आदी विविध भागातील शेतांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाअभावी पिकांची झालेली अवस्था पाहून त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. अनेक ठिकाणी पिके करपून गेली असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला गेल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यंदा तालुक्यात कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. काही भागात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला, तर काही ठिकाणी महिना-दीड महिना पावसाने पूर्णपणे खंड दिल्याने पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. मका, सोयाबीन, कपाशी, उडीद, मूग, तूर यासह जवळपास सर्वच खरीप पिकांना पावसाच्या कमतरतेचा मोठा फटका बसला आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे पिके कोरपून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

यावेळी बोलताना मंत्री महाजन म्हणाले की, “शेतकऱ्यांची परिस्थिती सरकारच्या लक्षात आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन आवश्यक त्या उपाययोजना करीत आहे. राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील ३५५ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.”

दुष्काळग्रस्त भागांमध्ये सध्या पंचनामे करण्याचे काम सुरू असून, पंचनामे पूर्ण करून त्याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. शासनाच्या नियमानुसार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जी मदत देणे शक्य आहे, ती दिली जाईल. तसेच शेतकऱ्यांना अधिक मदत करता येण्याची शक्यता असल्यास त्यासाठीही शासन सकारात्मक विचार करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

“नियमाप्रमाणे जी मदत देता येईल ती तर दिली जाईलच; मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी नियमांच्या चौकटीत अधिक काही करता आले, तर त्याचाही विचार केला जाईल. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही,” असे आश्वासन नामदार गिरीश महाजन यांनी दिले.

पिक पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी पावसाअभावी झालेल्या नुकसानीची माहिती मंत्र्यांना दिली. अनेक शेतकऱ्यांनी उत्पादन खर्चही निघण्याची शक्यता नसल्याची व्यथा मांडली. त्यावर शासनस्तरावरून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले.

या दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, तहसीलदार नानासाहेब आगळे, भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, भाजपा स्थानिक नेते जे. के. चव्हाण यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.



Post a Comment

0 Comments