दिशा लाईव्ह न्यूज -:-- लोहारा,ता.पाचोरा येथील डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालय तसेच शेंदुर्णी येथील गरुड विद्यालयाचे माजी विद्यार्थी, डॉक्टरेट पदवीने सन्मानित आणि सामाजिक, शैक्षणिक, सहकार, पत्रकारिता व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. अर्जुन भोई (सूर्यवंशी) यांना पुणे विभागातून शिक्षक आमदारकीची निवडणूक लढविण्यासाठी एका पक्षाकडून संधी देण्याची तयारी दर्शविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी शिक्षक आमदार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. भोई यांच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे.
डॉ. अर्जुन भोई हे लोहारा येथील गावदेवी मंदिराचे पुजारी कै. रामचंद्र भोई (सूर्यवंशी) यांचे पुत्र आहेत. ग्रामीण भागातून शिक्षण घेत विविध क्षेत्रांत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या डॉ. भोई यांच्या कार्याची दखल घेत त्यांना विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
पाच जिल्ह्यांतील सहकाऱ्यांशी चर्चा
पुणे विभागातील शिक्षक आमदारकीच्या संभाव्य उमेदवारीबाबत प्रतिक्रिया देताना डॉ. अर्जुन भोई यांनी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाचही जिल्ह्यांतील सहकारी, शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते तसेच हितचिंतकांशी विचारविनिमय करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे सांगितल्याचे समजते.
त्यामुळे पक्षाकडून मिळालेल्या या संधीबाबत डॉ. भोई नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे शिक्षक व शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
विविध क्षेत्रांत कार्याचा ठसा
डॉ. अर्जुन भोई यांनी मुंबई विभागासह विविध क्षेत्रांत सामाजिक, सहकार, शैक्षणिक, पत्रकारिता आणि सार्वजनिक जीवनाच्या माध्यमातून कार्य केले आहे. शिक्षण क्षेत्राशी असलेली त्यांची नाळ, शिक्षक व विद्यार्थ्यांशी असलेला संपर्क तसेच सामाजिक उपक्रमांमधील सहभाग यामुळे त्यांची संभाव्य उमेदवारी चर्चेचा विषय ठरत आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, गुणवंत शिक्षकीय पुरस्कार, खान्देशभूषण, बारा बलुतेदार महाराष्ट्रभूषण तसेच राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्कार यांसह विविध पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले आहेत.
शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीकडे लक्ष
पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे नियोजन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली असून २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान, तर २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मतमोजणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघात विविध इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. डॉ. अर्जुन भोई यांना एका पक्षाकडून उमेदवारीची संधी देण्याची तयारी दर्शविल्याची चर्चा असल्याने त्यांच्या निर्णयाकडे आता लोहारा परिसरासह पुणे विभागातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
दिनेश चौधरी, लोहारा.
संपादक-:- दिशा लाईव्ह न्यूज.
9309918930


Post a Comment
0 Comments