दिशा लाईव्ह न्यूज -:- लोहारा येथील डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालयात शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रम व मार्गदर्शनपर कार्यक्रमातून उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक व्ही. व्ही. पाटील होते. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. एम. सुर्वे, उपमुख्याध्यापक आर. जी. बैरागी तसेच वरिष्ठ शिक्षक ए. डी. गायकवाड, व्ही. टी. पाटील, पी. यू. खरे, के. के. बारी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक एन. डी. सुशीर यांनी केले. त्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांची व कार्याची माहिती दिली. महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीला दिलेले व्यापक नेतृत्व तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि देशसेवेच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य आंदोलनातील योगदान, सत्य व अहिंसेचा मार्ग आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी केलेला संघर्ष याबाबत मनोगत व भाषणे सादर केली. तसेच लालबहादूर शास्त्री यांनी देशाच्या संरक्षणासोबतच शेतकऱ्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करत दिलेल्या ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेचा अर्थ आणि आजच्या काळातील त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून मांडले.
यावेळी शिक्षक व्ही. बी. इंगळे यांनी महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य आंदोलनातील योगदानावर सविस्तर मार्गदर्शन केले. सत्य, अहिंसा आणि शांततामय मार्गाने केलेल्या संघर्षामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीला मिळालेली दिशा आणि गांधीजींच्या विचारांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. तसेच लालबहादूर शास्त्री यांनी पंतप्रधान म्हणून अत्यंत साधेपणाने, प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठेने काम करत देशाच्या इतिहासात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातील मूल्ये आत्मसात करून सत्य, प्रामाणिकपणा, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि देशसेवेची भावना जोपासावी, असा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय. पी. वानखेडे यांनी केले, तर आभार आर. आर. खोडपे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रपुरुषांच्या विचारांचे स्मरण आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा संदेश देत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


Post a Comment
0 Comments