Type Here to Get Search Results !

शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा सुरू लोहारा येथील डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालयाचा पुढाकार; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा


दिशा लाईव्ह न्यूज :- : लोहारा येथील डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालयात बाहेरगावाहून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून मोफत बससेवा सुरू करण्यात आली आहे. शाळेच्या वेळेनुसार ही बससेवा उपलब्ध राहणार असल्याने रामेश्वर तांडा, म्हसास, कासमपुरा, शहापुरा, कळमसरा आदी गावांमधून शिक्षणासाठी लोहारा येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी तसेच शाळा सुटल्यानंतर घरी परतण्यासाठी वाहतुकीची मोठी अडचण निर्माण होत होती. विशेषतः नियमित सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नसलेल्या भागातील विद्यार्थ्यांना वेळ, प्रवासाचा खर्च आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत बसपास उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.

मुलींसाठी अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत मोफत बसपास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठीही विद्यालयाच्या माध्यमातून ये-जा करण्यासाठी आवश्यक पासेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नियमित प्रवास करणे अधिक सुलभ होणार आहे.

बससेवा सुरू झाल्यानंतर विद्यालयाच्या वतीने बसचे चालक व वाहक यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला सुरक्षित आणि नियमित वाहतुकीची जोड मिळाल्याने शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

यावेळी विद्यालयाचे  आदर्श मुख्याध्यापक पी. एम. सुर्वे सर, उपमुख्याध्यापक आर. जी. बैरागी सर, पर्यवेक्षक व्ही. व्ही. पाटील सर, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मोफत बसपास उपलब्ध करून देण्यासाठी विद्यालयातील एस. एस. पाटील सर, ए. डी. गायकवाड सर आणि व्ही. टी. पाटील सर यांनी विशेष परिश्रम घेतले. 

विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन करण्यात आलेल्या या प्रयत्नामुळे परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नियमित शाळेत ये-जा करणे अधिक सोयीचे होणार आहे.



ही बस विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेनुसार नियमित उपलब्ध राहणार असून, त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यास तसेच शिक्षणातील वाहतुकीचा अडथळा दूर होण्यास मदत होणार आहे. विद्यालयाने घेतलेल्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments