Type Here to Get Search Results !

सेवा संकल्प अभियानातून ११ वर्षीय विद्यार्थ्याची मोफत शस्त्रक्रिया यशस्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे क्रोनिक टॉन्सिलायटिसवर उपचार; आरबीएसके पथकाच्या सहकार्याने पालकांना दिलासा


दिशा लाईव्ह न्यूज :- : सेवा संकल्प अभियानांतर्गत शेंदुर्णी येथील जिल्हा परिषद उर्दू बॉईज शाळेत शिक्षण घेणाऱ्या हुझेफ मुक्तार खान (वय ११ वर्षे) या विद्यार्थ्यावर क्रोनिक टॉन्सिलायटिस (दीर्घकालीन टॉन्सिलचा त्रास) या आजारावरील शस्त्रक्रिया १७ ऑक्टोबर २०२६ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे मोफत व यशस्वीरीत्या करण्यात आली. आरोग्य विभागाच्या समन्वयातून आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या (आरबीएसके) पथकाच्या सहकार्याने ही शस्त्रक्रिया पार पडल्याने विद्यार्थ्याला आवश्यक उपचार मिळाले असून पालकांनी समाधान व्यक्त केले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, जामनेरचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे आणि उपजिल्हा रुग्णालय, जामनेरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षल चांदा यांच्या सहकार्याने शस्त्रक्रियेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तसेच आरबीएसके जळगावच्या जिल्हा समन्वयक वर्षा वाघमारे यांनी विशेष सहकार्य केले.


या संपूर्ण प्रक्रियेत डॉ. चंद्रमणी सुरवाडे, डॉ. धनंजय पाटील, डॉ. जितेंद्र वानखेडे, डॉ. अनिता राठोड, प्रियंका वानखेडे आणि हर्षा गवळी यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. आरोग्य विभागातील अधिकारी आणि आरबीएसके पथकाच्या समन्वयामुळे विद्यार्थ्याला मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध झाली.

लहान वयातच आजारामुळे विद्यार्थ्याला त्रास सहन करावा लागत असताना, आरोग्य विभागाच्या पुढाकारातून योग्य उपचार मिळाल्याने पालकांना मोठा दिलासा मिळाला. यावेळी विद्यार्थ्याच्या पालकांनी आरबीएसके पथकातील सदस्यांसह संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

               बालकांच्या आरोग्याला प्राधान्य

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून बालकांमधील विविध आजारांचे निदान करून आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्यावर भर दिला जातो. सेवा संकल्प अभियानांतर्गत झालेली ही मोफत शस्त्रक्रिया आरोग्य यंत्रणेच्या समन्वयाचे उदाहरण ठरली असून, गरजू बालकांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.



Post a Comment

0 Comments