दिशा लाईव्ह न्यूज -:---पाणी हे जीवनाचे मूलभूत साधन असून भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. मात्र, एकीकडे प्रशासनाकडून नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील लोहारा-म्हसास धरणातून शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा सुरू असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून केली जात आहे. धरण परिसरात अनेक पाणी उपसा पंप सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून, हा उपसा नियमबाह्य असल्यास त्याची तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
लोहारा-म्हसास धरण हे परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे जलस्रोत आहे. या धरणाच्या पाण्यावर परिसरातील जवळपास तीन गावांच्या पाणीपुरवठ्याचा मोठा आधार आहे. लोहारा गावाची लोकसंख्या जवळपास १५ हजारांच्या आसपास असल्याने भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता धरणातील प्रत्येक थेंब महत्त्वाचा ठरणार आहे. यंदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याची स्थिती असताना धरणातील पाणीसाठ्याचा अनियंत्रित वापर झाल्यास आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
लोहारा आणि पाणीटंचाईचे समीकरण पुन्हा समोर येण्याची भीती
लोहारा परिसरात पाणीटंचाई ही नवीन बाब नाही. दरवर्षी उन्हाळा जवळ आला की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण होते. अशा परिस्थितीत उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करणे आणि त्याचा काटकसरीने वापर करणे अत्यावश्यक आहे. मात्र, धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असताना शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा सुरू असल्याच्या तक्रारींकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी पंपांच्या माध्यमातून सातत्याने पाणी उपसा होत असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी पाइपलाइनद्वारे शेतीपर्यंत पाणी नेले जात असल्याचेही सांगितले जात आहे. हा उपसा अधिकृत परवानगीने होत आहे की नियमबाह्य पद्धतीने, याची प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून स्पष्टता करणे आवश्यक आहे.
नागरिकांनी पाणी जपून वापरायचे, मग धरणातील पाण्याचे काय?
घरगुती वापरात पाणी वाया जाऊ नये, नळ सुरू ठेवू नये, पाणी जपून वापरावे, भविष्यातील टंचाई लक्षात घेऊन पाण्याची बचत करावी, असे आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना सातत्याने केले जाते. हे आवाहन निश्चितच योग्य आहे. मात्र, त्याचवेळी धरणातील मोठ्या जलसाठ्याचा अनियंत्रित उपसा होत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कोणाची, असा थेट सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
पाणी बचतीचा नियम केवळ सर्वसामान्य नागरिकांसाठी असू नये. धरणातील पाणी कोणत्याही प्रकारे नियमबाह्य पद्धतीने उपसले जात असेल तर त्यावरही कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. नागरिकांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जपायचा आणि दुसरीकडे धरणातून दिवस-रात्र पाणी उपसा सुरू राहायचा, अशी विसंगत परिस्थिती राहता कामा नये, अशी भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.
आता दुर्लक्ष केले तर उन्हाळ्यात टँकरची वेळ?
सध्या धरणात काही प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असला तरी त्याचा वेगाने उपसा होत राहिल्यास आगामी काळात परिस्थिती गंभीर होऊ शकते. पाण्याचा वापर, उपलब्ध साठा आणि भविष्यातील गरज यांचा विचार करून आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे.
अजून वेळ गेलेली नाही. धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठा आगामी उन्हाळ्यापर्यंत टिकवणे ही प्रशासनासह संपूर्ण गावाची सामूहिक जबाबदारी आहे. अन्यथा उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे आजच योग्य उपाययोजना केल्यास उद्याचे संकट टाळता येऊ शकते.
मुके जनावर, जंगल आणि गावाची तहानही लक्षात घ्या
धरणातील पाणी केवळ शेतीसाठीच नव्हे, तर पिण्याच्या पाण्यासह परिसरातील जनावरे आणि पर्यावरणासाठीही महत्त्वाचे आहे. धरणाच्या जवळच जंगलाचा परिसर असल्याने वन्यजीव व मुके जनावर यांच्यासाठीही उपलब्ध जलस्रोताचे महत्त्व मोठे आहे. पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणावर कमी झाल्यास त्याचा परिणाम केवळ माणसांवरच नव्हे, तर पशुधन आणि स्थानिक पर्यावरणावरही होण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित यंत्रणांनी लक्ष देण्याची मागणी
लोहारा-म्हसास धरणाची सध्याची पाण्याची स्थिती, पाण्याची पातळी आणि सुरू असलेल्या पाणी उपशाची वस्तुस्थिती याची संबंधित विभागांनी प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी होत आहे. धरण परिसरात सुरू असलेल्या पंपांची तपासणी करून ते अधिकृत परवानगीने सुरू आहेत की नाही, याची पडताळणी करणे गरजेचे आहे.
तसेच अनधिकृत पाइपलाइन किंवा नियमबाह्य पाणी उपसा आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
ग्रामप्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी आता पुढाकार घ्यावा
लोहारा ग्रामप्रशासक, गावातील लोकप्रतिनिधी, संबंधित जलसंपदा यंत्रणा, महसूल प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. केवळ कागदोपत्री पाहणी न करता धरण परिसरात प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
धरणातील पाण्याचा प्रत्येक थेंब आगामी काळात गावाच्या उपयोगी पडणार आहे. त्यामुळे अनधिकृत पाणी उपसा होत असल्यास तो तातडीने रोखणे, उपलब्ध पाणीसाठ्याचे संरक्षण करणे आणि आगामी उन्हाळ्यासाठी पाणी नियोजन करणे अत्यावश्यक आहे.
“आज पाणी वाचवले तर उद्याची तहान भागेल; आज दुर्लक्ष केले तर उद्या पाण्यासाठी भटकंती करावी लागू शकते,” अशी भावना व्यक्त करत लोहारा ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन धरणाची पाहणी करावी आणि पाण्याचा नियमबाह्य उपसा असल्यास कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
लोहारा पाझर तलावात ३०,००,००० तीस लाख रुपयापर्यंतची मत्स्य संपदा ही आज मितिस असून तिचे जीवन सदरील तलावाच्या पाणी पातळीवर अवलंबून आहे परिसरातील कोळी, भिल्ल, भोई जात जमाती ह्या त्षांचे उदरनिर्वाहाचे कार्य सदरील लोहारा पाझर तलाववर करतांना दिसतात .लोहारा येथील मिरगल मच्छीमार सहकारी सोसायटी ही सदरील तलावाच्या देखरेखीचे कार्य करत असून वरील संपुर्ण समुदाय हा आपल्या रोजीरोटीच्या प्रतिक्षेत तरी दिसून येते आहे...
अर्जुन भोईसर--लोहारेकर (मुंबई)


Post a Comment
0 Comments