दिशा लाईव्ह न्यूज :- : शाळेची बॅग खांद्यावर घेऊन नेहमीप्रमाणे शिक्षणासाठी घराबाहेर पडलेल्या अवघ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीवर काळाने अचानक घाला घातला. बसमध्ये चढत असताना अचानक तोल गेल्याने खाली पडलेल्या विद्यार्थिनीचा बसच्या मागील चाकाखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी पाळधी बसस्थानकात घडलेल्या या हृदयद्रावक अपघाताने नागरिकांसह विद्यार्थीवर्ग हादरला असून, एका होतकरू मुलीचा अकाली अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
राजनंदिनी श्रीराम शिंदे (वय १४, रा. सावदा, ता. एरंडोल) ही पाळधी येथील स. नं. झंवर विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत होती. शिक्षणाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असलेल्या राजनंदिनीच्या आयुष्याची स्वप्ने, तिच्या कुटुंबीयांच्या अपेक्षा आणि भविष्यातील अनेक संधी एका क्षणात काळाच्या पडद्याआड गेल्या.
सोमवारी राजनंदिनी पाळधी बसस्थानकात आली होती. यावेळी जळगावहून रवंजाकडे जाणाऱ्या एमएच ४० एन ९६४१ क्रमांकाच्या बसमध्ये चढत असताना अचानक तिचा तोल गेला. ती बसच्या खाली पडली आणि क्षणार्धात बसच्या मागील चाकाखाली आल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
क्षणार्धात आनंदाचे रूपांतर आक्रोशात
बसस्थानकात घडलेल्या या प्रकाराने उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. काही क्षणांपूर्वी बसमध्ये चढण्याची धावपळ सुरू असताना अचानक आरडाओरड आणि गोंधळ उडाला. उपस्थित नागरिक, विद्यार्थी व इतर प्रवाशांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. राजनंदिनीला वाचविण्यासाठी घटनास्थळी धावपळ सुरू झाली.
जखमी राजनंदिनीला तातडीने शिवसेनेच्या रुग्णवाहिकेतून जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर होते. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. ही बातमी समोर येताच तिच्या कुटुंबीयांवर आणि परिचितांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
आई-वडिलांच्या स्वप्नांवर काळाचा घाला
अवघ्या १४व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या राजनंदिनीच्या मृत्यूने अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवले आहेत. दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या या विद्यार्थिनीच्या डोळ्यांत भविष्यातील अनेक स्वप्ने होती. शिक्षण पूर्ण करून आयुष्यात काहीतरी मोठे करण्याची तिची धडपड सुरू असतानाच एका दुर्दैवी अपघाताने तिचे आयुष्यच संपविले.
ज्या मुलीला शाळेतून सुखरूप घरी परतताना पाहण्याची तिच्या कुटुंबीयांना अपेक्षा होती, त्याच मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकण्याची वेळ त्यांच्यावर आली. या घटनेने कुटुंबीयांचा आक्रोश आणि नातेवाईकांचे दुःख पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
पोलिसांकडून बस ताब्यात; तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश कोते यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त बस ताब्यात घेतली असून घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत घडला, बसची हालचाल कशी होती आणि विद्यार्थिनी बसमध्ये चढत असताना नेमकी परिस्थिती काय होती, याचा तपास पोलीस करीत आहेत.
बसस्थानकातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
या दुर्दैवी घटनेनंतर पाळधी बसस्थानकातील प्रवाशांच्या, विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गर्दीच्या वेळेत बसमध्ये चढताना-उतरताना विद्यार्थ्यांची मोठी धावपळ होत असते. त्यामुळे बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याची पाहणी केली. अपघाताची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरताच बसस्थानकात नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली.
एका क्षणाच्या अपघाताने एका कुटुंबाचा आधार, एका आई-वडिलांचे स्वप्न आणि एका विद्यार्थिनीचे भविष्य हिरावून घेतले. राजनंदिनीच्या अकाली जाण्याने पाळधीसह सावदा व परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने बसस्थानकातील सुरक्षिततेबाबतही गांभीर्याने विचार करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.


Post a Comment
0 Comments