Type Here to Get Search Results !

लोहारा धरणातील पाणीपातळी झपाट्याने घटतेय! ग्रामस्थांची चिंता वाढली; अवैध पाणीउपसा रोखणार कोण? प्रशासनाची तातडीने वृत्ताची दखल.पुढे काय?



दिशा लाईव्ह न्यूज --::---लोहारा परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा आधार असलेल्या लोहारा धरणातील पाणीपातळी यंदा ऑक्टोबर महिन्यातच झपाट्याने कमी होत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. धरणातून शेतीसाठी सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील पाणीउपशाकडे वेळीच लक्ष न दिल्यास आगामी काळात लोहारा तसेच परिसरातील गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते, अशी भीती ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, ‘दिशा लाईव्ह न्यूज’ने लोहारा धरणातील पाण्याचा अनधिकृत व मोठ्या प्रमाणातील उपसा, तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईचा प्रश्न सविस्तरपणे मांडल्यानंतर लोहारा प्रशासनाने या वृत्ताची त्वरित दखल घेतली आहे. प्रशासनाच्या या तत्परतेचे अनेक मान्यवर व ग्रामस्थांनी स्वागत केले असून, ‘दिशा लाईव्ह न्यूज’ने पाणीप्रश्न जनतेसमोर प्रभावीपणे मांडल्याबद्दल कौतुक व आभार व्यक्त केले आहेत.

           धरणातून इलेक्ट्रिक मोटारी काढण्याची दवंडी

प्रशासनाने धरणातील पाणीउपसा थांबविण्यासाठी तातडीची पावले उचलण्यास सुरुवात केली असून, धरणातून इलेक्ट्रिक मोटारी व पाणीउपशाची साधने त्वरित काढून घेण्याबाबत दवंडी देण्यात आली आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे धरणातील पाणीसाठा वाचविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

मात्र, केवळ दवंडी देऊन हा प्रश्न सुटणार नाही. आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करून धरणातून सुरू असलेला अनधिकृत पाणीउपसा प्रत्यक्षात बंद झाला आहे की नाही, याची नियमित पाहणी करण्याची गरज आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणत्याही दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

‘पाणी उशाला आणि कोरड घशाला’ अशी वेळ येऊ नये!

आज धरणात पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, त्याचा अमर्याद उपसा सुरू राहिला तर भविष्यात पाणी असूनही नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. ‘पाणी उशाला आणि कोरड घशाला’ अशी परिस्थिती लोहारा व परिसरातील ग्रामस्थांवर येऊ नये, यासाठी आतापासूनच पाण्याचे नियोजन व संरक्षण करणे आवश्यक आहे.



ग्रामस्थांच्या मते, सध्या धरणातील पाणी वाचविणे हीच सर्वांत मोठी गरज आहे. पाऊस पुन्हा येण्यासाठी अजून अनेक महिने बाकी आहेत. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करणे आणि अनधिकृत पाणीउपसा तातडीने थांबविणे अत्यावश्यक आहे.

  ग्रामपंचायतपासून प्रांताधिकाऱ्यांपर्यंत लक्ष देण्याची मागणी

लोहारा धरणातील पाणीपातळीतील झपाट्याने होणारी घट लक्षात घेता ग्रामपंचायत, प्रशासक, पंचायत समिती, पाटबंधारे विभाग, तहसीलदार, पाचोरा तसेच प्रांताधिकारी यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आज कारवाई केली नाही आणि धरणातील पाणी अनिर्बंधपणे उपसले गेले, तर उद्या निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईला जबाबदार कोण? असा थेट सवालही ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

       धरणावर कायमस्वरूपी वॉचमन ठेवण्याची मागणी

धरणातून रात्रीच्या वेळी किंवा प्रशासनाच्या नजरचुकीचा फायदा घेत पाणीउपसा होऊ नये, यासाठी धरणावर कायमस्वरूपी वॉचमन किंवा देखरेख व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणीही जोर धरत आहे. धरणातील पाणीसाठा, पाणीपातळी आणि पाणीउपसा यावर नियमित लक्ष ठेवले गेले तर भविष्यातील संकट टाळता येऊ शकते.

लोहारा, म्हसास, रामेश्वरच्या ग्रामस्थांचे कारवाईकडे लक्ष

लोहारा, म्हसास आणि रामेश्वर परिसरातील ग्रामस्थांचे आता प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे. ही कारवाई कोणत्याही व्यक्तीच्या दबावाला बळी न पडता निष्पक्ष आणि कठोरपणे करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

हा कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न नसून संपूर्ण परिसराच्या पिण्याच्या पाण्याशी संबंधित ज्वलंत प्रश्न आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा भविष्यासाठी सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रशासनासोबतच नागरिकांचीही आहे.

आजची दक्षता उद्याची पाणीटंचाई टाळू शकते

पाऊस पडण्यास अजून बराच कालावधी आहे. त्यामुळे आज धरणात असलेला पाणीसाठा अत्यंत महत्त्वाचा आहे. आत्ताच अनधिकृत पाणीउपसा रोखला, इलेक्ट्रिक मोटारी काढल्या आणि धरणावर नियमित देखरेख ठेवली, तर उपलब्ध पाणीसाठा आगामी पावसाळ्यापर्यंत टिकविण्याची शक्यता निश्चितच वाढू शकते.

उद्या पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आजच पाणी वाचविणे अधिक गरजेचे आहे. प्रशासनाने घेतलेली तातडीची दखल ही स्वागतार्ह बाब असली तरी प्रत्यक्षात पाणीउपसा पूर्णपणे बंद होतो का, याकडे आता लोहारा, म्हसास आणि रामेश्वर येथील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

धरण वाचले तर पाणी वाचेल आणि पाणी वाचले तरच लोहारा परिसराचे भवितव्य सुरक्षित राहील.




Post a Comment

0 Comments