Type Here to Get Search Results !

पहूरजवळ भीषण अपघात! भरधाव पिकअपच्या धडकेत सासू-जावयाचा जागीच मृत्यू घोडेश्वर बाबा मोरीजवळ दुचाकीला जोरदार धडक; सातगाव डोंगरी व गोंडखेल परिसरावर शोककळा



पहूर प्रतिनिधी- ता. जामनेर 

दिशा लाईव्ह न्यूज : पहूर–शेंदुर्णी मार्गावर घोडेश्वर बाबा मोरीजवळ सोमवारी (दि. १२ ऑक्टोबर) दुपारी भरधाव छोटा हत्ती पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सासू आणि जावयाचा जागीच मृत्यू झाला. राजू बाबुलाल परदेशी (वय ५६, रा. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा) आणि त्यांच्या सासूबाई विमलबाई ओंकार परदेशी (वय ७०, रा. गोंडखेल, ता. जामनेर) अशी मृतांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे सातगाव डोंगरी, गोंडखेल तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गावाकडे जात असताना काळाचा घाला

मिळालेल्या माहितीनुसार, सातगाव डोंगरी येथील राजू बाबुलाल परदेशी यांच्या घरी एका कार्यक्रमानिमित्त त्यांच्या सासूबाई विमलबाई परदेशी आल्या होत्या. कार्यक्रमानंतर त्यांना त्यांच्या मूळ गावी गोंडखेल येथे सोडण्यासाठी राजू परदेशी हे पल्सर दुचाकीने निघाले होते. दुचाकी क्रमांक एमएच १९ ईएच ०४९९ ने ते पहूरमार्गे जात असताना घोडेश्वर बाबा मोरीजवळ हा अपघात घडला.

दरम्यान, समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या छोटा हत्ती पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, राजू परदेशी आणि विमलबाई परदेशी हे दोघेही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले. काही क्षणांतच आनंदाने सुरू झालेला प्रवास दुर्दैवी ठरला आणि दोघांचाही मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

नागरिकांची मदत; रुग्णालयात मृत घोषित

अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने मदत करून दोघांनाही पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले.

या अपघाताची माहिती समजताच नातेवाइकांसह परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली. एकाच अपघातात कुटुंबातील दोन जवळच्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

विमलबाईंच्या आयुष्यात आधीच दुःखाचे सावट

मृत विमलबाई परदेशी यांच्या आयुष्यात यापूर्वीच अनेक दुःखद प्रसंग आले होते. त्यांचे पती तसेच दोन मुलांचे यापूर्वीच निधन झाले होते. त्यामुळे त्या सध्या त्यांची मुलगी देवकाबाई यांच्याकडे राहत होत्या. अशा परिस्थितीत या अपघातात त्यांचाही मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा आघात झाला आहे.

दुसरीकडे, राजू बाबुलाल परदेशी यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या राजू परदेशी यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दोन्ही गावांत अंत्यसंस्कार

विमलबाई परदेशी यांच्यावर सोमवारी सायंकाळी सात वाजता त्यांच्या मूळ गावी गोंडखेल येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तर राजू बाबुलाल परदेशी यांच्यावर मंगळवारी सकाळी दहा वाजता सातगाव डोंगरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.

पहूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

या घटनेप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी योगेश सुतार पुढील तपास करीत आहेत.

या भीषण अपघातामुळे पहूर–शेंदुर्णी मार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भरधाव वाहनांमुळे निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याने वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. एका कुटुंबातील दोन व्यक्तींचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments