Type Here to Get Search Results !

पत्रकार वसाहत आणि पत्रकार भवनासाठी प्रयत्न करणार! आमदार किशोर पाटील यांची ग्वाही; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय अधिवेशनात पत्रकारांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार; अधिकृत पत्रकारांची यादी व मागण्यांचे निवेदन सादर करण्याचे आवाहन


दिशा लाईव्ह न्यूज :--: पत्रकारांच्या विविध समस्या, मागण्या आणि त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून, पत्रकारांसाठी पत्रकार वसाहत आणि तालुकास्तरावर पत्रकार भवन उभारण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली. पाचोरा येथे शनिवार, दि. १० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आयोजित उत्तर महाराष्ट्रस्तरीय अधिवेशनात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या अधिवेशनात पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षिततेपासून पेन्शन, शासकीय योजनांचा लाभ, पत्रकार भवनासाठी जागा आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीपर पत्रकारिता अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

पत्रकारांच्या प्रश्नांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय अधिवेशनाला संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, पाचोरा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. सुनीताताई किशोर पाटील, प्रसिद्ध अहिराणी रील स्टार सचिन कुमावत, विद्या भाटिया (तोडांय आक्का), नगरसेवक प्रवीण ब्राह्मणे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय संपर्कप्रमुख कुंडलिक वाळेकर, नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख विजय शेळके, पत्रकार सचिन सोमवंशी यांच्यासह संघटनेचे विविध पदाधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अध्यक्षीय भाषणात आमदार किशोर पाटील म्हणाले की, "पत्रकारांच्या विविध समस्या आणि मागण्यांची आपल्याला जाणीव आहे. पत्रकार संघाला आपण आपल्या परिवाराचा एक भाग मानतो. पत्रकारांसाठी काहीतरी ठोस आणि विधायक काम करण्याची आपली प्रामाणिक इच्छा आहे. मात्र, सध्याच्या काळात प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियातील पत्रकारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ देताना पात्रता निश्चित करणे आणि प्रत्येकाला योग्य न्याय मिळवून देणे महत्त्वाचे आहे."

"यासाठी अधिकृत पत्रकारांची यादी तयार करून पत्रकारांच्या सर्व मागण्यांचे सविस्तर निवेदन संघटनेने सादर करावे. हे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवून संबंधित प्रश्नांवर पाठपुरावा केला जाईल," असा शब्द आमदार किशोर पाटील यांनी यावेळी दिला. पत्रकार वसाहत आणि पत्रकार भवनाच्या मागणीसाठीही आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

       'लाडका पत्रकार' योजना सुरू करण्याची मागणी

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा यांनी संघटनेच्या सामाजिक, विधायक आणि संघटनात्मक कार्याची माहिती दिली. संघटना केवळ पत्रकारांच्या प्रश्नांपुरती मर्यादित नसून समाजातील विविध घटकांसाठी उपयुक्त उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी सांगितले.



प्रमुख मार्गदर्शन करताना प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ ही पत्रकारांच्या हितासाठी काम करणारी संघटना आहे. पत्रकारांच्या सुख-दुःखात धावून जाणे, समाजोपयोगी उपक्रम राबविणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणे, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे, ही संघटनेची कार्यपद्धती आहे. आमची संघटना ही केवळ मागण्या करणारी नसून समाजाला देणारी संघटना आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

पत्रकारांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न मांडताना आरोटे यांनी पत्रकार पेन्शन योजनेचा मुद्दा उपस्थित केला. राज्य सरकारने पत्रकारांसाठी पेन्शन योजना जाहीर केली असली, तरी अनेक पत्रकार या योजनेच्या लाभापासून वंचित असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पात्र पत्रकारांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटितपणे लढा उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.



राज्य सरकारकडून लाडकी बहीण आणि लाडका भाऊ यांसारख्या योजना राबविल्या जात असताना पत्रकारांसाठीही स्वतंत्र 'लाडका पत्रकार' योजना सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली. पत्रकारांना सन्मानाने जगता यावे, त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षितता मिळावी आणि त्यांच्या अडचणींच्या काळात शासनाने आधार द्यावा, या उद्देशाने अशा योजनेची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार वसाहत आणि तालुकास्तरावर पत्रकार भवनाची गरज

पत्रकारांना अनेकदा प्रतिकूल परिस्थितीत काम करावे लागते. समाजातील प्रश्न मांडताना ते स्वतःच्या अनेक अडचणींकडे दुर्लक्ष करतात. मात्र, पत्रकारांच्या निवासाचा प्रश्न, बैठका घेण्यासाठी स्वतंत्र जागा, अभ्यास आणि चर्चेसाठी सुविधा तसेच संघटनात्मक कामकाजासाठी योग्य व्यवस्था या बाबींकडेही लक्ष देणे आवश्यक आहे, अशी भूमिका अधिवेशनात मांडण्यात आली.

पत्रकारांसाठी शासनाच्या माध्यमातून पत्रकार वसाहत उभारण्यात यावी, तसेच प्रत्येक तालुकास्तरावर पत्रकार भवनासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विश्वासराव आरोटे यांनी केली. पत्रकार भवनामुळे पत्रकारांना एकत्र येऊन चर्चा करणे, संघटनेचे कार्यक्रम आयोजित करणे, पत्रकारितेशी संबंधित उपक्रम राबविणे आणि नव्या पत्रकारांना मार्गदर्शन करणे शक्य होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या मागणीला उत्तर देताना आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार भवन आणि पत्रकार वसाहतीच्या उभारणीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही दिल्याने पत्रकारांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले.

अपघातग्रस्त पत्रकारांना आर्थिक मदत; रायसाकडा कुटुंबाचा माणुसकीचा आदर्श.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पाचोरा येथील पदाधिकाऱ्यांकडून दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत विविध विधायक उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, वंचित राहिलेल्या ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान, पत्रकारांच्या अपघात विम्यासाठी प्रयत्न आणि अडचणीत असलेल्या पत्रकारांना मदत अशा उपक्रमांमुळे संघटनेचे सामाजिक कार्य अधिक व्यापक झाले आहे.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या पत्नी ॲड. कविता रायसाकडा यांनी तीन अपघातग्रस्त पत्रकारांना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे आर्थिक मदत केली. संकटाच्या काळात पत्रकारांच्या पाठीशी उभे राहण्याचा हा उपक्रम माणुसकीचे दर्शन घडविणारा असल्याचे विश्वासराव आरोटे यांनी सांगितले. पत्रकारांच्या समस्या केवळ भाषणांतून मांडण्यापेक्षा प्रत्यक्ष मदतीच्या माध्यमातून त्यांना आधार देणे महत्त्वाचे असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.

पत्रकारांनी समाजातील प्रश्न मांडताना जबाबदारीची जाणीव ठेवावी, कोणाचेही आयुष्य उध्वस्त होईल अशा प्रकारचे लिखाण टाळावे आणि वस्तुस्थिती, सामाजिक हित व पत्रकारितेची नैतिकता यांना प्राधान्य द्यावे, असा कानमंत्रही आरोटे यांनी दिला.

             पत्रकार संघाच्या कार्याचा लेखाजोखा

संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी यांनी आपल्या मार्गदर्शनात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्याचा आढावा घेतला. राज्यभरातील पत्रकारांना एकत्र आणणे, त्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचविणे, संघटनात्मक ताकद वाढविणे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबविणे, या माध्यमातून संघटना सातत्याने काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पाचोरा येथील पदाधिकाऱ्यांनी वर्षभर राबविलेल्या सामाजिक उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. पत्रकारांच्या प्रश्नांसाठी संघटनेने एकजुटीने काम करणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

          'पत्रकार आणि कलाकारांवर पाचोरेकरांचे प्रेम'

प्रसिद्ध अहिराणी रील स्टार सचिन कुमावत यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. पाचोरा शहरातील नागरिक पत्रकार आणि कलाकारांवर प्रेम करतात. सामाजिक आणि विधायक कार्यासाठी पाचोऱ्यातील पत्रकार संघ नेहमी पुढाकार घेतो, ही समाधानाची बाब आहे. संघटनेच्या चांगल्या उपक्रमांसाठी आपण केव्हाही मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

           त्यांच्या या भूमिकेचे उपस्थितांनी स्वागत केले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुर्गोत्सव आणि वाढदिवसाचा खर्च टाळण्याचा निर्णय

राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा उल्लेख करत आमदार किशोर पाटील यांनी यंदा शिवसेनेच्या वतीने साजरा होणारा दुर्गोत्सव आणि १ नोव्हेंबर रोजी असलेला आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याची घोषणा केली. या उत्सवांवर होणारा अनावश्यक खर्च टाळून तो पैसा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री निधीत जमा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील अनेक भागांत दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. अशा परिस्थितीत उत्सवांवरील खर्चाला फाटा देऊन संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे ही काळाची गरज आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शक्य ते प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

     'पाणी अडवा, पाणी जिरवा' मोहिमेला पत्रकारितेतून बळ द्या

दुष्काळी परिस्थिती आणि अल निनोच्या संभाव्य परिणामांचा उल्लेख करत आमदार पाटील यांनी भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली. मात्र, आपल्या मतदारसंघात सध्या परिस्थिती तुलनेने चांगली असून मतदारसंघ सर्वांगीण सुखी करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

पत्रकारांनी केवळ घडलेल्या घटनांचे वृत्तांकन न करता समाजाला दिशा देणारे लिखाण करावे. पाणीटंचाई, जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे नियोजन, पाणी अडवा-पाणी जिरवा, वृक्षसंवर्धन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण यांसारख्या विषयांवर जनजागृती करणाऱ्या बातम्या व लेख प्रसिद्ध करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

पत्रकारितेचा उपयोग समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी झाला पाहिजे. पत्रकारांनी कोणत्याही परिस्थितीत चुकीच्या दिशेने न जाता सत्य, वस्तुनिष्ठता आणि सामाजिक जबाबदारी जपावी, असे सांगत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

          मान्यवरांची उपस्थिती; पदाधिकाऱ्यांचे परिश्रम

या अधिवेशनाला पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष समाधान मैराळे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रा. विजय गाढे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने, उपाध्यक्ष राकेश सुतार, उत्तर महाराष्ट्र संघटक विनोद कोळी, खान्देश विभागीय उपाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा रावेर विधानसभा पदाधिकारी सुरेश पवार, जिल्हा सचिव मनीष सोनवणे, पत्रकार हल्ला कृती समितीचे अध्यक्ष प्रल्हाद पवार, पाचोरा तालुकाध्यक्ष गौतम सोनवणे, भडगाव तालुकाध्यक्ष रतिलाल पाटील, अमळनेर तालुकाध्यक्ष सुरेश कांबळे, रावेर तालुकाध्यक्ष विजय अवसरमल आदींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार अयाज मोहसिन यांनी केले, तर प्रवीण ब्राह्मणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

पत्रकारांच्या हक्कांसाठी लढा, सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम आणि पत्रकार भवन व वसाहतीच्या मागणीसाठी शासनदरबारी पाठपुरावा, या मुद्द्यांमुळे पाचोरा येथील उत्तर महाराष्ट्रस्तरीय अधिवेशन लक्षवेधी ठरले. आता आमदार किशोर पाटील यांनी दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते, याकडे पत्रकारांचे लक्ष लागले आहे.



Post a Comment

0 Comments