Type Here to Get Search Results !

वाघूर धरण प्रकल्प क्षेत्रात ‘सामायिक शेततळे एक लोकचळवळ’ चिंतन बैठक उत्साहात संपन्न; ६० ते ७० शेतकऱ्यांचा सहभाग



दिशा लाईव्ह न्यूज -:---   शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत पाण्याची उपलब्धता व्हावी, सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी आणि सामूहिक प्रयत्नांतून जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त व्हावे, या उद्देशाने वाघूर धरण प्रकल्प क्षेत्रातील गावांसाठी आयोजित करण्यात आलेली ‘सामायिक शेततळे एक लोकचळवळ’ ही चिंतन बैठक मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी जामनेर येथील पंचायत समिती सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडली. पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून सत्यमेव जयते फार्मर कप अंतर्गत सक्रिय शेतकरी गटांसाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला वाघूर धरण प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील विविध गावांमधील सुमारे ६० ते ७० शेतकरी बंधू-भगिनींनी उपस्थिती लावली.

या चिंतन बैठकीला वाघूर धरण प्राधिकरणाचे उपविभागीय अधिकारी श्री. राहुल खानपुरे, सहायक अभियंता श्री. सागर काकडे, शाखा अभियंता श्री. स्वप्नील देवराज, श्री. पवार, कनिष्ठ अभियंता श्री. जयेश भोई यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. तसेच पानी फाऊंडेशनचे विभागीय समन्वयक श्री. राजेश हिवरे, मेंटर तथा सहाय्यक कृषी अधिकारी श्री. अकिल तडवी, फिल्ड ऑफिसर श्री. सचिन आगळे आणि तनुजा साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

            तीन टाळ्या आणि पुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत

बैठकीच्या प्रारंभी पानी फाऊंडेशनच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनुसार उपस्थित अधिकारी आणि शेतकरी बांधवांचे तीन टाळ्यांच्या गजरात व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. बैठकीचे प्रास्ताविक पानी फाऊंडेशनचे विभागीय समन्वयक श्री. राजेश हिवरे यांनी केले. त्यांनी सामायिक शेततळे योजनेची संकल्पना, तिच्यामागील भूमिका, शेतकऱ्यांचा सहभाग आणि सामूहिक प्रयत्नांतून जलव्यवस्थापन साध्य करण्याचे महत्त्व विशद केले.


यानंतर सामायिक शेततळे योजनेच्या कार्यपद्धतीची माहिती देणारी चित्रफीत उपस्थितांना दाखविण्यात आली. चित्रफितीच्या माध्यमातून योजनेचे स्वरूप, तिची उपयुक्तता आणि शेतकऱ्यांना होणारे संभाव्य फायदे समजावून सांगण्यात आले.

     सामायिक शेततळे योजनेची अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती

यानंतर वाघूर धरण प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सामायिक शेततळे योजनेची तांत्रिक व प्रशासकीय माहिती सविस्तरपणे मांडली. या योजनेचे दोन टप्पे असून पहिल्या टप्प्यातील अनेक कामे पूर्ण झाली आहेत, तर दुसऱ्या टप्प्यातील कामे सध्या प्रगतिपथावर असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

वाघूर धरण प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील गावांमधील शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य दिले जाणार आहे. त्याचबरोबर भविष्यात गरज आणि तांत्रिक निकषांची पूर्तता लक्षात घेऊन लाभक्षेत्राबाहेरील गावांतील शेतकऱ्यांचाही पुढील टप्प्यांमध्ये विचार केला जाऊ शकतो, अशी सकारात्मक भूमिका अधिकाऱ्यांनी मांडली. मात्र, त्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



विशेष म्हणजे, देशात अशा स्वरूपाची ही एकमेव सामायिक शेततळे योजना असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या योजनेचा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात देशातील अन्य भागांमध्येही अशा प्रकारच्या सामूहिक जलव्यवस्थापनाच्या उपक्रमांना चालना मिळू शकते. त्यामुळे या योजनेकडे केवळ एका भागापुरती मर्यादित योजना म्हणून नव्हे, तर देशपातळीवर अनुकरणीय ठरू शकणारा प्रयोग म्हणून पाहिले जात आहे.

              शेतकऱ्यांच्या शंका, प्रश्न आणि अडचणींवर चर्चा

बैठकीच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात उपस्थित शेतकऱ्यांनी योजनेसंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले. सामायिक शेततळ्यांची निर्मिती, पाणी साठवण, पाईपलाईनची व्यवस्था, जमिनींची उपलब्धता, कामांची अंमलबजावणी आणि लाभ मिळण्याची प्रक्रिया अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. उपस्थित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले.

योजनेची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जात असल्याने काही वेळा कामांना विलंब होतो. तसेच सुरुवातीला अनेक शेतकरी आपल्या जमिनी सामायिक शेततळे किंवा पाईपलाईनच्या कामांसाठी देण्याबाबत फारसे उत्सुक नसतात. काही ठिकाणी पीकपद्धती, पाणीवाटप आणि शेतीविषयक अडचणीही निर्माण होतात. मात्र, योजनेचे स्वरूप आणि त्यातून मिळणारे फायदे समजून घेतल्यानंतर शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद वाढत असल्याचे लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवकथनातून सांगितले.

                  लाभार्थी शेतकऱ्यांनी मांडले अनुभव

या योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनी आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले. सामूहिक प्रयत्नांतून पाण्याचे नियोजन केल्यास शेतीसाठी अधिक परिणामकारक व्यवस्था निर्माण होऊ शकते, याची जाणीव त्यांच्या अनुभवांतून झाली. सुरुवातीला काही अडचणी आणि शंका असल्या तरी योजनेची माहिती घेतल्यानंतर त्याचे महत्त्व लक्षात येते, असेही त्यांनी नमूद केले.

यामुळे बैठकीत केवळ शासकीय योजना समजून घेण्यापुरती चर्चा न राहता, प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या अनुभवांतून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न झाला.

     सक्रिय शेतकरी गटांचा पुढाकार; पुढील कार्यवाहीचे आश्वासन

पानी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप अंतर्गत कार्यरत असलेल्या सक्रिय शेतकरी गटांनी या योजनेचा लाभ घेण्याची तयारी दर्शविली. यासाठी इच्छुक शेतकरी बांधवांची नावे व माहिती उपस्थित वाघूर धरण प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी नोंदवून घेतली.

पुढील टप्प्यात संबंधित शेतकऱ्यांशी संपर्क साधून योजनेची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी आवश्यक प्रयत्न केले जातील, असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. अधिकाधिक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी शासनस्तरावर आवश्यक उपाययोजना आणि शेतकऱ्यांचे समुपदेशन केले जात असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

              सामूहिक सहभागातून जलसमृद्धीचा संकल्प

शेतीच्या विकासासाठी पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन, साठवण आणि सामूहिक वापर ही काळाची गरज बनली आहे. अशा परिस्थितीत सामायिक शेततळे योजना शेतकऱ्यांना एकत्र आणून जलव्यवस्थापनाची नवी दिशा देऊ शकते. मात्र, या योजनेचे यश शासकीय यंत्रणा, पानी फाऊंडेशन आणि शेतकरी यांच्यातील समन्वय व परस्पर सहकार्यावर अवलंबून राहणार आहे.

जामनेर येथे झालेल्या या चिंतन बैठकीतून शेतकऱ्यांमध्ये योजनेविषयी जागरूकता निर्माण होण्याबरोबरच अधिकाधिक शेतकऱ्यांनी सामूहिक पद्धतीने पुढाकार घेण्याची सकारात्मक भूमिका समोर आली. बैठकीच्या शेवटी उपस्थित सर्व अधिकारी, शेतकरी बंधू-भगिनी आणि मान्यवरांचे पानी फाऊंडेशनच्या वतीने आभार मानण्यात आले.

सामायिक शेततळे ही केवळ पाणी साठविण्याची योजना नसून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जलसमृद्धी साधण्याची लोकचळवळ ठरू शकते, असा आशावाद या बैठकीतून व्यक्त झाला.

Post a Comment

0 Comments