दिशा लाईव्ह न्यूज :- : येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी संचलित अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाणिज्य विभागातील सन २०१४ च्या टी.वाय.बी.कॉम.च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तब्बल बारा वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देत आनंदाचे आणि भावनिक क्षण अनुभवले.
महाविद्यालयात अकरावीपासून पदवीपर्यंत शिक्षण घेत असताना घालवलेला अविस्मरणीय काळ, मित्र-मैत्रिणींसोबतचे क्षण, प्राध्यापकांचे मार्गदर्शन, वर्गातील गमतीजमती आणि महाविद्यालयाने दिलेली संस्कारांची शिदोरी पुन्हा एकदा अनुभवता यावी, या उद्देशाने या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. जी. बी. शेळके होते. व्यासपीठावर माजी विद्यार्थी संघाचे समन्वयक डॉ. अमर जावळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. योगिता चौधरी यांनी माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून अशा स्नेह मेळाव्यांचे आयोजन करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाशी असलेले नाते कायम राहावे, जुन्या आठवणींना उजाळा मिळावा आणि माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवांचा लाभ सध्याच्या विद्यार्थ्यांना व्हावा, यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य प्रा. डॉ. जी. बी. शेळके यांनी माजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या संपर्कात कायम राहण्याचे आवाहन केले. आपण आयुष्यात कितीही मोठे झालात, यशाची कितीही शिखरे गाठलीत, तरी ज्या महाविद्यालयाने आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला, त्या महाविद्यालयाला कधीही विसरू नका. आपल्या अनुभवांचा आणि यशाचा उपयोग नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी करा, असे त्यांनी नमूद केले.
यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना मनमोकळेपणाने व्यक्त केल्या. गजानन सरोदे, संदीप राजपूत, आशा बारी, अश्विनी बारी आणि अर्चना बारी यांनी मनोगत व्यक्त करत महाविद्यालयीन जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला. बारा वर्षांनंतर पुन्हा एकत्र भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. काही विद्यार्थ्यांना जुन्या आठवणी सांगताना भावना अनावर झाल्या आणि त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले.
महाविद्यालयातील प्राध्यापकांनी दिलेले ज्ञान, केलेले मार्गदर्शन, रुजवलेले संस्कार आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिलेली साथ यामुळेच आजच्या आयुष्यात यशस्वी होण्याचा मार्ग सुकर झाला, अशी कृतज्ञतेची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. महाविद्यालयाशी आणि तेथील गुरुजनांशी निर्माण झालेले ऋणानुबंध हे आयुष्यभर जपण्यासारखे असल्याचेही त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, आपण ज्या महाविद्यालयात शिक्षण घेतले त्या संस्थेचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून माजी विद्यार्थ्यांनी भविष्यातही महाविद्यालयाच्या विकासासाठी सढळ हाताने सहकार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. याच भावनेतून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठी माजी विद्यार्थी संघाकडे एक छोटी साऊंड सिस्टिम भेट म्हणून सुपूर्द करण्यात आली. माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
हा स्नेह मेळावा केवळ जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट ठरला नाही, तर विद्यार्थी आणि महाविद्यालय यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते पुन्हा दृढ करणारा भावनिक सोहळा ठरला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक वर्षे उलटली, तरी महाविद्यालयाने दिलेली संस्कारांची शिदोरी आणि गुरुजनांचे मार्गदर्शन आयुष्यभर सोबत असते, याची प्रचिती या कार्यक्रमातून आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अर्चना बारी यांनी केले, तर मनीषा भुईकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. जुन्या आठवणी, आनंद, कृतज्ञता आणि नव्या नात्यांची वीण घट्ट करत हा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला.


Post a Comment
0 Comments