Type Here to Get Search Results !

जलसंधारणासाठी जळगाव जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणा आणि पाणी फाउंडेशन एकवटले! सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०२७-२८ च्या पूर्वतयारीसाठी जिल्हास्तरीय बैठक उत्साहात संपन्न; गावागावांत जलसंवर्धनाची लोकचळवळ उभारण्याचा निर्धार


दिशा लाईव्ह न्यूज :-- : राज्यातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली दुष्काळी परिस्थिती, हवामान बदलाचे वाढते संकट आणि पाण्याची उपलब्धता यांचा विचार करता जलसंधारणाची कामे लोकसहभागातून प्रभावीपणे राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पाणी फाउंडेशनच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०२७-२८ च्या अनुषंगाने जळगाव येथे जिल्हास्तरीय बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत विविध शासकीय विभागांनी समन्वयाने काम करून गावागावांत जलसंधारणाची लोकचळवळ उभी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

पाणी फाउंडेशन गेल्या दहा वर्षांपासून पाणी आणि शेती या महत्त्वपूर्ण विषयांवर ग्रामीण भागात प्रशिक्षण, जनजागृती आणि लोकसहभागाच्या माध्यमातून कार्यरत आहे. या उपक्रमाला शासनाकडूनही सहकार्य मिळत आहे. नुकत्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान व त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत राज्यभरात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आयोजित करण्याबाबत चर्चा झाली. या उपक्रमामागे केवळ स्पर्धा घेणे हा उद्देश नसून गावकऱ्यांच्या सहभागातून जलसंधारणाची शाश्वत चळवळ उभी करणे हा मुख्य हेतू आहे.




या पार्श्वभूमीवर १८ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता जळगाव येथील अल्पबचत भवनात जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांच्या उपस्थितीत, जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार तसेच मृदा व जलसंधारण विभाग जळगाव यांच्या समन्वयाने कार्यकारी अभियंता राहुल मानकर यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.

बैठकीस उपजिल्हाधिकारी तथा रोजगार हमी योजना शाखेच्या श्रीमती मंजुषा घाडगे, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता रा. मा. मानकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) भाऊसाहेब अकलाडे, भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्थेच्या वरिष्ठ वैज्ञानिक वर्षा जैन, जलसंपदा विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष पाटील, यावल वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील, गिरणा धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, उमेद अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक भोई सर, सुशील पाटील, चंद्रकांत सोनवणे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे युवराज पाटील व विजय सोनवणे, सेवानिवृत्त प्रकल्प संचालक कृषी अनिल भोकरे, पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक राजेश हिवरे, फार्मर कपचे मेंटर्स, सहाय्यक कृषी अधिकारी तसेच उमेद अभियानाचे प्रभाग समन्वयक आदी मान्यवर उपस्थित होते.

माथा ते पायथा जलसंधारणावर डॉ. अविनाश पोळ यांचे मार्गदर्शन

बैठकीदरम्यान डॉ. अविनाश पोळ यांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेपासून फार्मर कपपर्यंतच्या प्रवासाची माहिती विविध व्हिडिओ आणि पीपीटीच्या माध्यमातून उपस्थितांना दिली. दुष्काळी परिस्थिती आणि हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून माथा ते पायथा या पद्धतीने मृद व जलसंधारणाची कामे करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जलसंधारणाची कामे केवळ यांत्रिक पद्धतीने न करता स्थानिक भौगोलिक परिस्थिती, मातीचा प्रकार, पाण्याचा प्रवाह आणि शेतीची गरज लक्षात घेऊन नियोजनबद्धरीत्या केली पाहिजेत. यासाठी ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग आणि सर्व शासकीय विभागांचा समन्वय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून पटवून दिले.

प्रत्येक गावातून दोन महिला आणि दोन पुरुषांची निवड

या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात प्रत्येक गावातून दोन महिला आणि दोन पुरुष अशा चार स्वयंप्रेरित व्यक्तींची निवड करण्याचे आवाहन डॉ. पोळ यांनी केले. निसर्ग, शेती, माती आणि पाणी या विषयांमध्ये आवड असलेल्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात यावे. निवड झालेल्या चार प्रशिक्षणार्थींना पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन त्यांना 'जलयोद्धा' आणि 'कृषियोद्धा' म्हणून घडविण्याची जबाबदारी फाउंडेशन स्वीकारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही व्यक्त केली चळवळीत सहभागी होण्याची तयारी

यावेळी उपजिल्हाधिकारी मंजुषा घाडगे, गिरणा धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील, उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक भोई सर तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. मातीशी नाते जोडून काम करण्याची गरज अधोरेखित करताना लोकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासकीय कामकाजाच्या पलीकडे जाऊन पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या कामकाजातील अनुभव मांडत त्यांनी पाणी फाउंडेशनच्या या लोकचळवळीत आनंदाने सहभागी होण्याची तयारी दर्शविली.

तालुकास्तरावर जनजागृती आणि गावपातळीवर प्रशिक्षणार्थी निवड

बैठकीच्या पुढील नियोजनाबाबत पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक राजेश हिवरे यांनी माहिती दिली. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र बैठका घेण्यात येणार असून, त्यासाठी विविध शासकीय विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी, गावांचे सरपंच आणि ग्रामसेवक यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. या बैठकांमधून वॉटर कप स्पर्धेविषयी जनजागृती करून गावपातळीवर दोन महिला व दोन पुरुष अशा चार प्रशिक्षणार्थींची निवड केली जाणार आहे.

एकूणच, जलसंधारण ही केवळ शासकीय यंत्रणेची जबाबदारी नसून ती प्रत्येक गावाची आणि प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश या बैठकीतून देण्यात आला. शासनाचे विविध विभाग, पाणी फाउंडेशन आणि ग्रामस्थ यांच्या एकत्रित प्रयत्नांतून जळगाव जिल्ह्यात जलसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभी राहण्याच्या दृष्टीने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

बैठकीच्या शेवटी राजेश हिवरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.


संपादक-दिशा लाईव्ह न्यूज.

दिनेश सोनजी चौधरी,

लोहारा, ता.पाचोरा

9309918930

Post a Comment

0 Comments