Type Here to Get Search Results !

शेतीच्या व्यवहारातून कन्नडच्या व्यावसायिकाची निर्घृण हत्या! डोक्यात लोखंडी रॉडने वार करून खून; मृतदेह बहुळा धरणात फेकला पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील धक्कादायक घटना; दोघांना अटक, सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यावसायिकाचा अखेर मृतदेह आढळला!


दिशा लाईव्ह न्यूज -:--शेतीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाल्याची खळबळजनक घटना पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे उघडकीस आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील व्यावसायिक डॉ. संजय मनोहर तेली (वय ५२) यांची निर्घृण हत्या करण्यात आली असून, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचा मृतदेह पोत्यात भरून बहुळा धरणात फेकल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचोरा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

      --     एक कोटी दोन लाखांचा जमीन व्यवहार

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डॉ. संजय तेली हे वैद्यकीय व्यवसायासोबतच जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहारही करीत होते. पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील राहुल धर्मराज पाटील यांची दोन एकर जमीन एक कोटी दोन लाख ५० हजार रुपयांना खरेदी करण्याचे ठरले होते. या व्यवहारापोटी डॉ. तेली यांनी राहुल पाटील यांना ८० लाख रुपयांची बयाणा रक्कम दिली होती.

              पैशांच्या व्यवहारातून वाद अन् हत्येची घटना

दि. १७ नोव्हेंबर रोजी डॉ. तेली हे कन्नड येथून आपल्या चारचाकी वाहनाने मुलीसोबत निघाले होते. मुलीला जळगाव येथील गोदावरी मेडिकल कॉलेज येथे सोडल्यानंतर ते पिंपळगाव हरेश्वर येथे आपल्या शालकाकडून पाच लाख रुपये घेण्यासाठी गेले.

त्यानंतर सांगवी (प्र. लो.) येथील घरी जाऊन त्यांनी तीन लाख दहा हजार रुपये ठेवले आणि उर्वरित एक लाख ९० हजार रुपये घेऊन दि. १८ नोव्हेंबर रोजी गोराडखेडा येथे राहुल पाटील याच्याकडे गेले.

यावेळी जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. या वादाचे रूपांतर गंभीर हाणामारीत झाले. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, राहुल पाटील याने डॉ. तेली यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

             मृतदेह बहुळा धरणात फेकल्याची कबुली

हत्येनंतर आरोपी राहुल पाटील याने आपल्या सालदाराच्या मदतीने डॉ. तेली यांचा मृतदेह पोत्यात भरला आणि जवळच असलेल्या बहुळा धरणात फेकून दिल्याची कबुली दिल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.

दरम्यान, डॉ. संजय तेली हे १८ नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांचा शोध घेण्यासाठी एक लाख २१ हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.

           पोलिसांच्या तपासाला यश; धरणात शोधमोहीम

या गंभीर प्रकरणाचा तपास जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचोरा पोलिसांनी हाती घेतला. तपासादरम्यान राहुल धर्मराज पाटील आणि त्याच्या सालदाराचा या हत्येत सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले.

संशयितांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दि. २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून बहुळा धरणात मृतदेहाचा शोध सुरू करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आरसीपी प्लाटूनसह पाचोरा पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

अखेर दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास बहुळा धरणात डॉ. संजय तेली यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, या प्रकरणी पाचोरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

शेतीच्या व्यवहारातील आर्थिक वादातून एका व्यावसायिकाचा अशा प्रकारे जीव गेल्याने परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमधील वाद किती गंभीर वळण घेऊ शकतात, याची पुन्हा एकदा जाणीव करून दिली आहे.

Post a Comment

0 Comments