दिशा लाईव्ह न्यूज :- : लोहारा येथून जवळच असलेल्या कळमसरा गावात शेतातून कापूस चोरी झाल्याच्या घटनेचा पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी यशस्वी तपास करत उलगडा केला आहे. शेतकऱ्याच्या शेतातून चोरीस गेलेला तब्बल पाच क्विंटल कापूस हस्तगत करण्यात आला असून, या प्रकरणी दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कळमसरा येथील कुंभारखाण शिवारातील गट क्रमांक ६५०/१ मधील शेतातून अंदाजे पाच क्विंटल कापूस चोरीला गेला होता. चोरी झालेल्या कापसाची बाजारभावानुसार अंदाजे किंमत ४० हजार रुपये होती.
याप्रकरणी कळमसरा येथील शेतकरी पवन राजू माळी (वय २६) यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ५२०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस पथकाची तत्परता; तपासाला वेग
शेतमाल चोरीच्या या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक बापू रोहम तसेच पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली.
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी स्वतंत्र तपास पथक तयार करून संशयितांचा शोध सुरू केला. पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत या चोरीप्रकरणी श्रावण शांताराम कोळी (वय २७, रा. कळमसरा, ता. पाचोरा) आणि विजय बाळू सोनवणे (वय ३०, रा. मालखेडा, ता. जामनेर) या दोघांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान संशयितांनी कापूस चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी चोरीस गेलेला पाच क्विंटल कापूस हस्तगत केला. या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
या पथकाने केली उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल तात्याबा नागरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल शांतिलाल पगारे आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश भिलखांडे यांच्या पथकाने केली.
शेतकऱ्यांच्या कष्टातून आणि घामातून उभ्या राहणाऱ्या शेतमालाची चोरी होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. विशेषतः कापूस वेचणीच्या हंगामात शेतमालाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत असतो. अशा परिस्थितीत पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी तत्परतेने तपास करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पोलिसांच्या या कामगिरीचे कळमसरा, लोहारा तसेच परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Post a Comment
0 Comments