Type Here to Get Search Results !

लोहारा येथील डॉ. जे. जी. पंडित विद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी! विद्यार्थ्यांनी महात्मा फुलेंच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला उजाळा देत व्यक्त केले विचार


दिशा लाईव्ह न्यूज ::--::  लोहारा, ता. पाचोरा  येथील डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालयात शनिवार, दि. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी आदरपूर्वक साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या महान सामाजिक, शैक्षणिक आणि परिवर्तनवादी कार्याचे स्मरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक श्री. एन. डी. सुशीर सर होते. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पी. एम. सुर्वे सर, उपमुख्याध्यापक श्री. आर. जी. बैरागी सर आणि पर्यवेक्षक श्री. व्ही. व्ही. पाटील सर यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे उपशिक्षक श्री. ए. डी. गायकवाड सर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद, विषमता आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध त्यांनी केलेल्या संघर्षाची माहिती दिली. शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवून आणण्याचा महात्मा फुले यांचा विचार आजही तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.


यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याविषयी आपले विचार प्रभावीपणे मांडले. स्त्री शिक्षणाचा पाया रचण्यासाठी त्यांनी केलेले कार्य, वंचित व उपेक्षित घटकांना शिक्षणाची दारे खुली करून देण्यासाठी घेतलेला पुढाकार तसेच समाजातील विषमता दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न याविषयी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी शिक्षकांच्या वतीने श्री. पी. यू. खरे सर यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करणारे गीत सादर केले. त्यांच्या गीतातून महात्मा फुले यांच्या विचारांचा आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. एन. डी. सुशीर सर यांनी अध्यक्षीय मनोगतात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनातील विविध पैलूंवर सविस्तर प्रकाश टाकला. स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेले अथक प्रयत्न, सावित्रीबाई फुले यांच्या साथीने सुरू केलेली शैक्षणिक चळवळ, समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा आणि विषमतेविरुद्ध दिलेला लढा तसेच त्यांनी केलेली साहित्यनिर्मिती याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महात्मा फुले यांचे विचार केवळ स्मरणापुरते मर्यादित न ठेवता ते आपल्या आचरणात आणणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बी. एन. पाटील सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. वाय. पी. वानखेडे सर यांनी मानले.

या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा फुले यांच्या विचारांचे स्मरण आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा संदेश देत कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.


                       संपादक-:-दिशा लाईव्ह न्यूज.


Post a Comment

0 Comments