दिशा लाईव्ह न्यूज--::-- जिल्हा परिषद मराठी शाळेची पटसंख्या वाढीसाठी गोंडखेल ग्राम पंचायतीने आदर्श उपक्रम राबवत इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या पाल्यांच्या पालकांना वर्षभरासाठी घरपट्टी व पाणीपट्टी कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गावातील मराठी शाळेचा दर्जा वाढविण्यासाठी सदैव कटिबध्द राहण्याचे आश्वासन सरपंच विठ्ठल सोन्ने यांनी दिले.
गोडखेल ,ता.जामनेर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत गोंडखेल तर्फे दप्तर व इतर शालेय साहित्य वाटप करण्यात आले त्यावेळी सरपंच विठ्ठल सोन्ने यांनी वरील निर्णय घोषित केला. तसेच शाळेच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. भविष्यात शाळा डिजिटल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद मराठी शाळेत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस पाटील सुनील मगर हे होते तर उपसरपंच गणेश वाघ, राजू राजपूत, प्रभू राजपूत, निलेश राजपूत, राजू दुडे, हरिभाऊ इंगळे हे ग्रामपंचायत सदस्य तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा आरती कोळी यांचेसह पालक ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी गावातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी अभ्यासिकेची सुद्धा निर्मिती ग्राम पंचायत तर्फे करण्यात आली. सदर अभ्यासिकेसाठी सुद्धा ग्राम पंचायतीच्या वतीने आवश्यक ग्रंथ व इतर सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिल्या. याकामी ग्रामविस्तार अधिकारी श्रीमती वराडे यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच शाळेचे मुख्याध्यापक रमेश पाटील, अशोक कोळी, आकोश कोळी, राजाराम कोळी, नामदेव पाटोळे, प्रमोद पाटील, ज्या हणमंते या शिक्षकांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
Post a Comment
0 Comments