पहूर प्रतिनिधी-ता. जामनेर.
दिशा लाईव्ह न्यूज--::-- “कोणावर अन्याय करणे हा जसा गुन्हा आहे, त्याचप्रमाणे अन्याय सहन करणे देखील गुन्हाच आहे. जागृत राहून अत्याचाराविरुद्ध वेळीच आवाज उठवूया. बालकांनी लैंगिक अत्याचाराला बळी पडू नये,” असे कळकळीचे आवाहन बालरक्षक तसेच पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष शंकर भामेरे यांनी केले.
महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित डॉ. हेडगेवार प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. शेंदुर्णी येथील शाळेत १०वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा आणि तीव्र शब्दात निषेध केला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अजय देशमुख होते.त्यांनी प्रास्ताविक केले . यावेळी अमोल क्षीरसागर यांनी शासकीय परिपत्रकाचे वाचन केले. युनूस तडवी, मनोज खोडपे, संदीप पाटील, सोनाली शेकोकारे, किरण पाटील, विद्या पवार यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काय आहे ‘पोस्को कायदा’ ?
२०१२ पासून लागू झालेला ‘पोस्को कायदा’ हा लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा आहे. या कायद्यामुळे अल्पवयीनांवरील अत्याचार गंभीर गुन्हा मानला जातो.
बालकांची भूमिका
शाळा, बस किंवा रस्त्यात काही संशयास्पद घटना घडल्यास न घाबरता पालक, शिक्षक किंवा विश्वासू व्यक्तींना सांगावे.
अनोळखी पुरुषांशी बोलू नये व त्यांच्याकडून खाऊ घेऊ नये.
आलेल्या प्रसंगाला धैर्याने सामोरे जावे.
पालकांची भूमिका
मुलांशी मुक्त संवाद साधावा.
त्यांच्या मनातील भीती व गोंधळ समजून घ्यावा.
कठीण परिस्थितीत मुलांना आधार द्यावा.
शाळेची भूमिका
विद्यार्थ्यांचे नियमित समुपदेशन करावे.
शाळेत येणाऱ्या अभ्यागतांची चौकशी करावी.
शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
सखी सावित्री दामिनी यासारख्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी .
बालरक्षक शंकर भामेरे यांच्या या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागृती झाली असून, समाजातील प्रत्येक घटकाने बालसुरक्षेसाठी जागरूक राहणे अत्यावश्यक असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Post a Comment
0 Comments