Type Here to Get Search Results !

खान्देश चे प्रति पंढरपुर नगरी असलेल्या शेंदुर्णी येथील पोळा सण उत्सव,क्षेत्र शेंदुर्णी ते क्षेत्र रुद्रेश्वर पायी दिंडीची २८२ वर्षांची परंपरा आजही अव्याहतपणे सुरू आहे.



 दिशा लाईव्ह न्यूज --::---खान्देश चे प्रति पंढरपुर नगरी असलेल्या शेंदुर्णी येथे धार्मिक परंपरा सण उत्सव सोहळे आजही वर्षानुवर्षे अंखडीतपणे सुरू आहे.सर्व संतांच्या जयंती, पुण्यतिथी, रथोत्सव, यात्रोत्सव, श्रीराम जन्मोत्सव सोहळा,संत रुपलाल महाराज यांच्या नावाने सुरू असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह, संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे वतीने सुरू असलेला हरिनाम कीर्तन सप्ताह व हरिपाठ महिला भजनी मंडळ यांनी अखंडपणे सुरू ठेवलेला हा सोहळा, श्री चक्रधर स्वामी अवतारदिन सोहळा ,दर एकादशी ला श्री त्रिविक्रम महाराज यांच्या मंदिरात होणारे कीर्तन, भल्या पहाटे सुरु होणारी प्रभातफेरी,दर एकादशीला व गुरुवारी होणारी श्री संत गजानन महाराज यांच्या बावन्नीचा सोहळा,स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने राबविण्यात येणारे धार्मिक सोहळे, गणेशोत्सव नवरात्रोत्सवात होणारे धार्मिक कार्यक्रम तसेच व्याख्यानमाला व अनेक कार्यक्रम सोहळे,सण उत्सव आजही वर्षानुवर्षे अंखडीतपणे परंपरागत सुरू आहे.



शेतकरी वर्गाचा आपल्या सगळ्यांच्या अविभाज्य भाग असलेला पोळा हा सण सुद्धा शेंदुर्णी परिसरात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतो आता मात्र यामध्ये थोडासा नवीन पिढी मुळे बदल झाल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.

पोळ्याच्या दिवशी नदीवर आपले बैल नेऊन अंघोळ घाऊन , दुपारी तेलाने मालिश करुन बैलांचे शिंग साफ करून मस्त रंगरंगोटी करून अंगावर झुल शिंगांना विविध रंग फुल हार घालुन सजवले जाते.गोड नैवेद्य दाखवला जातो आधी पोळा फुटला की गावात सगळीकडे आनंदीआनंद आनंद असायचा आता मात्र जो तो आपल्या सोयीनुसार आपल्या सवंगड्यांच्या सोबत घेऊन गल्लीत नुसते बैलं पळवण्याच धन्यता मानत असतात.उत्साह प्रचंड असतो मात्र सणाचे महत्त्व पावित्र्य मात्र हळुहळु कमी होत असुन गोंधळ गडबड आरोळ्या देत हा काय किंवा अन्य कोणताही उत्सव सण साजरा होऊ नये.



पोळ्याच्या दिवशी भल्या पहाटे पासुनच बस स्थानक परिसरात असलेल्या मरीआई मंदिरात भाविकांची नैवेद्य अर्थात बोणं देण्यासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी होते.महिला भल्या पहाटे ऊठुन स्वयंपाक करून देवाला नैवेद्य अर्पण करण्यासाठी या ठिकाणी गर्दी असते.

हनुमान मंदिर तसेच सार्वजनिक वाचनालय खाली सुद्धा नैवेद्य दाखवला जातो.दुपारी  काही ठिकाणी संध्याकाळी गोडधोड जेवण होते.शेतातील सालदारास कपडे देऊन त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.५ वाजेपासुन मग बैलपोळा सुरू होतो.आकर्षक सजावट फुलं हार,फुगे व नवनवीन दागदागिने घालून आपल्या सर्जा राजाला सजवले जाते आणि शहरातील विविध ठिकाणी आपल्या परिवारातील सदस्य परिचय असलेल्या ठिकाणी या बैलाला नेलं जातं घरोघरी बैलांची औक्षण करून पुरणपोळी घालुन पुजा केली जाते.चौकाचौकात लागणारी नारळ तोडण्यासाठी होणारी स्पर्धा सुद्धा कमी होत आहे.

                    क्षेत्र शेंदुर्णी ते क्षेत्र रुद्रेश्वर पायी वारी..

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात कर चे दिवशी संतश्रेष्ठ कडोजी महाराज यांनी प्रारंभ केलेली २८२ वर्षाची भव्य परंपरा असलेल्या क्षेत्र शेंदुर्णी ते क्षेत्र रुद्रेश्वर पायी वारी दिंडी संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे गादीवारस हभप शांताराम महाराज भगत यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ७ वाजता संत कडोजी महाराज यांच्या मंदिरात पासुन भालदार चोपदार भगत मंडळी यांचे सोबत हरी हरी विठोबा रखुमाई या नामघोषात ही पायी वारी दिंडी क्षेत्र रुद्रेश्वर जाण्यासाठी प्रस्थान ठेवले.शहरातील विविध भागातुन दिंडी निघाली की भाविक यात सहभागी होत असतात पाण्याच्या टाकीजवळ सोयगाव रस्त्यावर पायी वारी मध्ये हजारो भाविक सहभागी होत असतात.

शेंदुर्णी सोयगाव गलवाडा आणि वाडी असा नामघोषात जयजयकाराने ही पायी दिंडी नदी नाले पार करत डोंगर चढत उतरत हजारो भाविक सोबत घेऊन दुपारी १२ वाजता बरोबर क्षेत्र रुद्रेश्वर मंदिरात आरतीसाठी हजर होत असतात.भव्य प्राचीन शिवमंदिर कपारीत असलेलं हे मंदिर या ठिकाणी गणपतीची सुद्धा मुर्ती आहे.

डोंगरातुन कोसळणारा प्रचंड धबधबा मंदिरात दर्शनासाठी जाताना पडणार अंगावर पाणी आणि डोंगरात असलेले हे प्राचीन शिवालय मंदिर सभोवताली असलेले सुंदर दृश्य यामुळे डोंगर चढुन आलेल्या भाविकांना आनंद देत थकवा घालवतो . असंख्य भक्त पायीच ही वारी करत असतात.या ठिकाणाहुन अगदी जवळच वाडी किल्ला सुद्धा इतिहासकालीन प्रेक्षणीय निसर्गरम्य ठिकाण आहे.या ठिकाणी सुद्धा नागरिक गर्दी करतात.

दर्शन झाल्यावर ही पायी दिंडी सोयगाव येथे येते.गावकऱ्यांच्या कडुन पायी वारीचे स्वागत करण्यात येते.परंपरेनुसार संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे गादीवारस हभप शांताराम महाराज भगत यांचे हरी कीर्तन होते.कीर्तन झाल्यावर पायी वारीत सहभागी मंडळींना महाप्रसादाचे वितरण केले जाते.

संध्याकाळी पायी दिंडीचे शेंदुर्णी शहरात स्वागत करण्यात येते.सोयगांव येथुन पुढे दिंडी हनुमान मंदिरापासुन मग नदीच्या काठावर असलेल्या संतश्रेष्ठ कडोजी महाराज यांच्या समाधी मंदिरात जाते.श्री.त्रिविक्रम महाराज यांच्या मंदिरात, श्रीराम मंदिरात पारंपरिक आरती होते प्रसाद वितरण झाल्यावर हरीनामाचा जय घोष करत पायी वारीची सांगता मग संतश्रेष्ठ कडोजी महाराज यांच्या मंदिरात आरती होऊन संपन्न होते.


संकलन -:- ॲड.देवेंद्र गोविंदराव पारळकर 

चालक श्रीरामचंद्र देवस्थान शेंदुर्णी.

Post a Comment

0 Comments